फलटण (जि. सातारा) : शहरांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या गावांकडच्या मुलींना सडक सख्याहरींचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या जाचातून त्यांची सुटका करण्यासाठी बसस्थानक ते महाविद्यालयापर्यंत त्यांना पोलीसगाडीतून पोहोचवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली आहे. या सेवेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. पोलिसांच्या या आगळ््यावेगळ््या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.फलटण शहरात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालयासाठी ग्रामीण भागातून मुली येतात. यातील बहुसंख्य तरुणी मुधोजी कॉलेज येथे जातात. बसस्थानकापासून महाविद्यालय दोन किलोमीटरवर असल्याने पायी जाताना त्यांना छेडछाडीचा सामना करावा लागत होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलीस व्हॅन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देखमुख यांनी घेतला. व्हॅनमध्ये महिला पोलिसांचीही नेमणूक केली आहे. महाविद्यालयाला जाण्या-येण्याच्या वेळेत ही सेवा दिली जाणार आहे. पोलीस व्हॅनच्या सेवेमुळे पालक वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे. ह्णह्णशहरात शिकायला गेलेली मुलगी घरी परतत नाही, तोवर आमच्या जीवात जीव नसतो. पण यामुळे आता बरीच काळजी मिटलीह्णह्ण, ही एका आईची प्रतिक्रिया सेवेचे महत्त्व अधोरेखीत करणारी आहे. तर मुलींना असा बंदोबस्त ज्या कारणांसाठी द्यावा लागतो त्या प्रवृत्तींचाही पोलीसांनी कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी फलटणकर करीत आहेत. (प्रतिनिधी) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचनाशहरातील वाढती गुन्हेगारी व वाहतूक कोंडी यावर ठोस उपाययोजना सुरू असून, मोठ्याप्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शहरातील बंद पडलेल्या श्रीराम पोलीस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस चौक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
मुलींसाठी महाविद्यालयापर्यंत पोलीस व्हॅनची सेवा
By admin | Published: January 30, 2016 1:44 AM