ऑनलाइन लोकमत गोंदिया, दि. 25 - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली ते बोरटोलाच्या या गावांदरम्यान जंगलातील डांबरी रस्त्यालगत नक्षलवाद्यांनी आपले बॅनर लावल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. तेंदू कंत्राटदारांना इशारा देणारे हे बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी भुसुरूंग पेरून ठेवल्याचे वेळीच लक्षात आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने सायंकाळी ५ वाजतादरम्यान ते निकामी केले.बॅनरच्या निमित्ताने पोलिसांना त्या ठिकाणी येण्यास प्रवृत्त करायचे आणि भुसुरूंग उडवून घातपात घडवायचा असा नक्षलवाद्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा घातपात टळला. ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावले होते त्याच्या जवळच तीन भुसुरूंग पेरलेले होते. जमिनीत स्टीलच्या डब्यात बारूद भरून त्याला प्रेशर बॉम्ब बनविले होते. याशिवाय डिटोनेटर्सचा वापर करून टायमरसुद्धा लावलेले होते. प्रेशर बॉम्ब म्हणून त्या भुसुरूंगाने काम न केल्यास पोलीस तो डबा उघडण्यासाठी जातील आणि झाकण उघडताच टायमर सुरू होऊन काही क्षणात बॉम्ब फुटेल अशी व्यवस्था केली होती. मात्र भुसुरूंगाचा एक वायर पोलिसांना दिसल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सावधपणे परिसरात तपासणी केली. गोंदियावरून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. त्यांनी ते भुसुरूंग निकामी केले. याप्रकरणी केशोरी पोलिसांनी भादंवि कलम ४, ५ , भारतीय स्फोटक अधिनियम १८, २०, २३ बेकायदेशिर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे भरनोली येथे पोलिसांचे सशस्त्र दूरक्षेत्र केंद्र (एओपी) आहे. तिथे २४ तास सशस्त्र पोलिसांचा ताफा असतो. तेथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी भुसुरूंग पेरून बॅनर लावण्याची हिंमत केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांच्या सतर्कतेने उधळला घातपाताचा डाव, भूसुरुंग केले निकामी
By admin | Published: April 25, 2017 10:28 PM