कल्याण : एनआरसी कंपनीतील भंगार चोरी प्रकरणात एमएफसी पोलिसांनी १४ जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींमध्ये ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या दिनेश सोडनवार या हवालदाराचाही समावेश असून, तोच या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात समोर आले आहे.मोहने येथील एनआरसी कंपनी अनेक वर्षांपासून बंद आहे. या कंपनीच्या आवारात असलेले भंगार सामान चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. अशाच एका चोरीच्या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीवरून एमएफसी पोलिसांनी १२ जणांना गजाआड केले. त्यांच्या चौकशीत पोलीस हवालदार सोडनवार आणि भंगारविक्रेता माणिकचंद गुप्ता या दोघांची नावे उघड झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. या टोळीने संबंधित कंपनीत याआधी तीन वेळा चोरी केली होती़ परंतु चौथ्या वेळेस त्यांची चोरी पकडली गेली. कंपनीने नेमलेले सुरक्षा कर्मचारीदेखील त्यांना सामील होते. चोरी करणाऱ्या १२ जणांना कामासाठी प्रत्येकी ५०० रुपये मिळत. सोडनवार माल भंगारविक्रेता गुप्ताला द्यायचा. टोळीने ५ ते ६ लाखांचा माल चोरला आहे. सोडनवार यांचे वडील एनआरसी कंपनीतच कामाला होते. (प्रतिनिधी)
पोलीस हवालदार निघाला भंगारचोर
By admin | Published: January 29, 2015 5:38 AM