नवी मुंबई : मुंबई पोलीस दलासह राज्यातील सर्व पोलिसांना त्या त्या महापालिकांच्या शहर परिवहन सेवांमधून आता मोफत प्रवास करता येणार नाही. पोलिसांना देय असलेला वाहतूक भत्त्याचा आता त्यांच्या पगारात समावेश केल्याने गृह विभागाने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी विशेष आदेश काढून पोलिसांना महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवेश करता येणार नाही, याबाबतचे निर्देश दिले आहेत.
गृह विभागाने ४ मार्च १९९१ रोजी विशेष आदेश काढून बेस्ट पुणे, सोलापूर, कोल्हापूर महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवासाची मुभा दिली होती. कालांतराने ही सवलत नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, केडएमसीची केडीएमटी, ठाणे महापालिकेची टीएमटीसह इतर महापालिकांच्या परिवहन सेवांनाही लागू करण्यात आली. या बदल्यात गृह विभाग त्या-त्या महापालिकेस दरवर्षी विशेष अनुदान देत असे.
... म्हणून सवलत बंद ■ मुंबईसह राज्यातील इतर महापालिका क्षेत्रातील बहुसंख्य पोलीस शासकीय वाहने किवा खासगी वाहनांनी कामावर जात •असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना रेल्वेसह परिवहन सेवांना अनुदान म्हणून देण्यात येत असलेला वाहतूक भत्ता आता एप्रिल २०२२ पासून पोलिसांच्या पगारात देण्याचा निर्णय घेतला आहे.■ यामुळे गृह विभागाने आता पोलिसांची सिटीमधील मोफत प्रवासाची सवलत बंद केली आहे. यामुळे हात दाखवून वाट्टेल तिथे बस थांबवून फुकट प्रवास करणाऱ्या पोलिसांच्या मनमानीसही यामुळे आळा बसणार आहे. तसेच कंडक्टरकडून रीतसर तिकीट घेऊनच त्यांना सिटी बसमधून प्रवास करावा लागणार आहे.■ मुंबई महापालिकेची बेस्ट, नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, कॅडएमसीची केडीएमटी, ठाणे महापालिकेच्या टीएमटीसह राज्यातील कोणत्याच महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून पोलिसांना आता मोफत प्रवास करता येणार नाही.