ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 9 - शिवनगर भागात वास्तव्यास असलेल्या अहमदपूरच्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेत 9 एमएमची एक पिस्तुल, 5 काडतुसे व दागिने, असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अहमदपूर येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक रमेश सोलापुरे हे यापूर्वी उदगीर शहर ठाण्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे वास्तव्यसही उदगीरमध्येच होते. मात्र, बदलीनंतरही ते शिवगनर भागात वास्तव्यास होते. दरम्यान, 27 एप्रिल रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. आजाराने त्रस्त असलेल्या सोलापुरे यांचा त्रास वाढल्याने त्यांनी तातडीने बंगळुरु येथे उपचारासाठी धाव घेतली.
तेथे ते 8 मे पर्यंत उपचार घेत होते. यादरम्यान, उदगीरमधील त्यांच्या निवासस्थानी कोणीही नव्हते. ही संधी साधून चोरट्यांनी घरफोडी करत कपाटाचे लॉकर तोडले. चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले 9 एमएमचे पिस्तुल, 5 काडतुसे, 1 तोळ्याचे सोन्याची कर्णफुले, 2 तोळे चांदीचे जोडवे असा जवळपास 51 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला.
रमेश सोलापुरे हे उपचार घेऊन उदगीर येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. शिवाय घरातील कपाटही फोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यास माहिती दिल्यानंतर पंचानामा करुन रात्री उशीरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे पुढील तपास करीत आहेत.
पिस्तुल जमा करणे आवश्यक
रजेवर जाण्यापूर्वी संबंधित अधिका-यांनी आपली पिस्तुल, काडतुसे आपल्या किंवा नजिकच्या ठाण्यात जमा करणे आवश्यक असते. परंतु, ते या प्रकरणात घरीच असल्याचे समोर आले आहे़ यासंदर्भात सोलापुरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. परंतु, त्यांच्या नातेवाईकांनी सोलापुरे यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाल्याने पिस्तुल जमा करण्यास वेळ मिळाला नसल्याचे कारण सांगितले.