- प्रमोद जाधव (उपायुक्त, समाजकल्याण)
पॉलिश न केलेले तांदूळ अधिक पौष्टिक असतात. लालदाणा असलेल्या तांदळामध्ये उपयुक्त मूलद्रव्य अधिक प्रमाणात असल्याने औषधी गुणधर्म आहेत. वालय, बेळा व लाल मुंडगा आदी जातीच्या तांदळाची पेज अतिशय पौष्टिक आहे. एक ग्लास पेज एक सलाईनप्रमाणे ऊर्जा देते, स्थानिक भातापासून तांदूळ, उकडा तांदूळ, पोहे, भाकरी, पेज, मोदकर, लाडू, पापड/फेणी, शेवया असे विविध प्रकार बनविले जातात. या स्थानिक वाणापासून पशुधनासाठी चांगला चारा उपलब्ध होतो.
सफेद वेळा, सफेद वालय, येलकट, शिरटी, भरडे तुरई, डामगा, कोथिंबीर साळ, राजवेल, पटणी, कोलम, आंबेमोहोर, सोनफळ, लवंसाळ, वरंगळ आदी प्रकार पांढऱ्या तांदळात मोडतात. लाल तांदळात कांळा वेळा, लाल वालय, सोरटी, कोचरी, लाल मुंडगा, सनाना, राता, महाडी, दोडक, लालपटणी आदींचा समावेश आहे. अनेक चांगले गुणधर्म असूनही काही अडचणींमुळे लागवड कमी होते. शुद्ध बियाणे उपलब्ध नसल्याने त्यांचे उत्पादन नवीन सुधारित/संकरित जातीपेक्षा कमी येते.
काही जातींमध्ये फुटवा कमी येतो, तसेच काही जाती उंचीने जास्त असल्याने पीक शेवटच्या टप्प्यात जमिनीवर लोळून नुकसान होते. बियाणे निवडताना अधिक फुटवा असणाऱ्या निरोगी रोगाच्या सशक्त लॉबीतील दाणे निवडून शुद्ध बियाणे टप्प्याटप्प्याने तयार करावे, सर्वप्रथम भात शेतीचे निरीक्षण करून अधिक उंची असणाऱ्या रोपाच्या लोंब्या, बुटक्या रोपाच्या अशक्त लोंब्या, कुसळ असणाऱ्या लोंब्या, कीडरोग असणाऱ्या, तसेच पोकळ लोंब्या काढून टाकाव्यात, अशा प्रकारे भेसळ काढल्यानंतर सर्वसाधारण एकसारखे पीक दिसेल. सशक्त लोंब्यांसाठी बांधाजवळील लोंब्या न निवडता सर्व शेतातून निवडाव्यात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या चुडातील लोंब्या निवडू नयेत.