- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागावेत, म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी लढविलेली आॅनलाइन तपासणीची शक्कल अयशस्वी झाल्याने, विद्यापीठाचे निकाल, प्रवेश अशा सर्वच प्रक्रियेला विलंबाचा टीळा लागला आहे. त्यातच एफडी तोडल्याची माहिती पुढे आल्याने, आता सर्वच स्तरातून कुलगुरूंवर टीका होत आहे. तर विद्यापीठातील प्रश्नांना राजकीय रंग येऊ लागले आहेत. शनिवारी, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनीही विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळावर टीका केली, तर अनेक संघटनांकडून कुलगुरूंच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. निकाल लवकर लागावेत, म्हणून आॅनलाइन पद्धतीचा वापर यंदापासून करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला, मात्र तो फसला. त्यामुळे जून महिना संपूनही निकाल जाहीर झाले नाहीत. विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले. त्यामुळे या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर, १११ एफडीच्या ठेवी मुदतपूर्व काढल्याची माहिती समोर आली, पण कुलगुरूंनी याला नकार दिला. शनिवारी, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठातील गोंधळावर टीका करीत, एफडी प्रकरणी कुलगुरूंची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. विद्यापीठात आॅनलाइन प्रवेश होत नाहीत, तर मग आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा अट्टाहास का? असा प्रश्नही या वेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबई विद्यापीठात होत असलेल्या कारभाराची गंभीर दखल घेतली पाहिजे. एफडी मुदतपूर्व तोडल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी करणारे पत्र स्टुडंट लॉ कौन्सिलतर्फे मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मुदतपूर्व ठेवी काढल्याने, विद्यार्थ्यांचा विद्यापीठावरचा विश्वास कमी होईल. याविषयी कुलगुरूंची चौकशी करावी, अशी मागणी मनविसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनीदेखील केली आहे. प्रहार विद्यार्थी संघटनेनेही कुलगुरूंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.