"राज्यात लवकरच राजकीय स्फोट होणार, राष्ट्रवादीत धुसफूस हेच कारण"
By नितीन चौधरी | Published: September 24, 2022 06:44 PM2022-09-24T18:44:03+5:302022-09-24T18:46:27+5:30
बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडून दाखवू...
पुणे :अजित पवार यांना गृहमंत्रीपद हवे होते त्यांची तशी योग्यता होती मात्र शिवसेना व काँग्रेसने तसे होऊ दिले नाही. राष्ट्रवादीत धुसफूस असून या निमित्ताने ती उघड झाली आहे. त्यामुळे काही दिवसांनी राज्यात राजकीय स्फोट होईल असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "अजित पवार बोलले ते खरेच आहे. मात्र, त्यांच्या सहयोगी पक्षांनी तसे होऊ दिले नाही. ते गृहमंत्री झाले असते तर प्रगती झाली असती. तसे न झाल्याने अडीच वर्षांत राज्य मागे पडले. राष्ट्रवादीत धुसफूस आहे हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. मी मागेही याबाबत बोललो होते. ते खरे ठरले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठा राजकीय स्फोट होऊ शकतो." अजित पवार देवेंद्र फडणवीस पुणे एकत्र येतील का प्रश्नावर मात्र याविषयी त्यांनाच विचारा असे सांगून उत्तर देण्याचे टाळले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती येथील दौऱ्याबाबत ते म्हणाले, "येत्या निवडणुकीत जनता काय ठरवेल ते मान्य असेल मात्र आम्ही पूर्ण जोर लावून बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडून दाखवू. ते बंद पडावे या साठी आमचे प्रयत्न आहेत."
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदीची मागणी
पुण्यात पी एफ आय च्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या, हे देशद्रोही आहे, अशा संघटना देशात राज्यात नकोत. त्यामुळे भाजप या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी करेल असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
एकनाथ खडसे भाजपात येणार का?
एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याची चिन्हे आहेत का याबाबत मला प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काहीही माहिती नाही. तसा कोणताही प्रस्ताव नाही, ते अमित शहा यांना भेटले, काय बोलले मला माहित आम्ही पण ते भाजपमध्ये येतील ही चर्चा निरर्थक आहे. मात्र, राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.