विश्वास पाटील, कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या वेळेला खुले झाल्याने प्रत्येक नेत्याला आपल्या वारसाला तिथे संधी देण्याची घाई झाली आहे. त्यामुळे घराणेशाहीला ऊत आला आहे. या जिल्ह्यात तब्बल सतरा वारसदार आपले भविष्य आजमावत आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार व खासदारांचे तिघे जवळचे नातलग आहेत.निवडणूक कोणतीही असो त्यातील घराणेशाही ही आता मतदारांच्यासुद्धा अंगवळणी पडू लागली आहे. किंबहुना मतदारांकडूनच ती जोपासली जात आहे. कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील हे आपला मुलगा राहुल याला उमेदवारी द्यायला तयार नव्हते; परंतु त्या मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल आठ तास त्यांना रोखून धरले. राहुल पाटील याला उमेदवारी दिल्याशिवाय अन्य मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांनी ए बी फॉर्म स्वीकारले नाहीत. शेवटी लोकांच्या दबावापुढे नमते घेऊन मुलास रिंगणात उतरविण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.लोकसभा व विधानसभेला प्रस्थापित कुटुंबातील उमेदवारांना संधी मिळते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीला तरी किमान पक्षासाठी व नेत्यांसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षा असते; परंतु तसे घडताना दिसत नाही. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता यादेखील नवे आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्र ठरल्या आहेत. तिथे जाऊन जशी विकासकामे करता येतात तशी अनेकांची कोंडी करता येते. ग्रामीण राजकारणावर वर्चस्व मिळविता येते. त्यासाठी मग हे पद आपल्याच गोतावळ्यात राहावे, असे नेत्यांना वाटत आहे.कोल्हापुरात भाजपाचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका रिंगणात आहेत. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा नातू वीरेंद्र शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार गोविंदराव कलिकते यांची सून गेल्या निवडणुकीत रिंगणात होती, आता त्यांचा मुलगाच संजय मैदानात आहे म्हणजे घराणेशाही जोपासण्यात सगळेच डावे-उजवे पक्ष हिरिरीने पुढे आहेत; शिवाय ही घराणेशाही कोल्हापूरपासून चेन्नई ते उत्तर प्रदेशपर्यंत सगळीकडेच आहे.यासंदर्भात राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘राजकीय नेतृत्वाच्या वारसदारांना संधी दिली जावी, अशी मानसिकता आता मतदारांची आणि राजकीय पक्षांचीही होत आहे. त्यांच्याकडे आर्थिक सामर्थ्य, राजकीय वर्चस्व आणि यंत्रणा राबविण्याची ताकद असते. हे सगळे वारसाला अलगदपणे मिळते. ही घराणेशाही सर्व पक्षांत दिसते म्हणून तर जयललितांशी कोणताही संबंध नसताना लोकशाही संकेत पायदळी तुडवून आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी शशिकला यांची निवड होत आहे. नेत्यांच्या वारसदारांना त्यांच्याकडे क्षमता असेल तर का संधी मिळू नये, अशीही विचारणा केली जाते; परंतु समान संधीच्या तत्त्वाचा विचार केल्यास हे वारसदार शर्यत सुरू होण्यापूर्वीच पुढे असतात. पद्मश्री विखे-पाटील कुटुंबापासून ते अनेक ठिकाणी असे अनुभवण्यास येते की तिथे मागच्या पिढीच्या तुलनेत पुढील पिढीतील नेतृत्व तितकेसे प्रभावशाली नाही परंतु तरीही त्यांना वारसा म्हणून ही संधी मिळाली आहे.
राजकीय घराणेशाही
By admin | Published: February 07, 2017 11:40 PM