विखेंच्या शुभेच्छा, भुजबळांची फिरकी, खडसेंची मदत, विधानसभेत राजकीय टोलेबाजी
By अतुल कुलकर्णी | Published: June 25, 2019 04:33 AM2019-06-25T04:33:09+5:302019-06-25T04:36:44+5:30
काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले.
या सभागृहाला विरोधीपक्ष नेत्यांची मोठी परंपरा आहे. याआधी या पदावर एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे यांनी चांगले काम केले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनपर भाषणात म्हणताच, छगन भुजबळ म्हणाले, पाच वर्षात तीन विरोधी पक्ष नेते झाले. आता वडेट्टीवारांनाही तिकडे नेऊ नका म्हणजे झाले... वरही हास्याचे फवारे उडाले. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांच्याविषयी बोलताना विखे पाटील यांना नथीतून तीर मारला.
ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्याने सक्षमपणे काम केले पाहिजे, त्याने सरकारची धोरणे बदलवण्यास भाग पाडले पाहिजे, जनमत बदलण्याची क्षमता त्यांच्यात असते... त्यांच्या या प्रत्येक विधानाचा विखेंच्या दिशेने जाणारा रोख पाहून सभागृह त्यांना जोरदार प्रतिसाद देत होते. खरी बॅटींग केली ती एकनाथ खडसे यांनी. विखे पाटलांनी या पदाचा आगळा वेगळा कार्यकाळ पार पाडला आहे. भाजपचे सरकार देशात आले त्यात राज्याच्या तेव्हाच्या विरोधी पक्ष नेत्याचाही खारीचा वाटा आहे असा चिमटाही खडसे यांनी काढला. विरोधी बाकावरुन सत्ताधारी बाकावर येणे, मंत्री होणे आणि सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांना हटवून तिसऱ्या नंबरची जागा मिळवणे याला भाग्य लागते, असेही खडसे म्हणाले.
खडसे यांना मंत्री का केले नाही हे खडसे आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर खडसे म्हणाले, आमच्या दोघांचे काय ते ठरलंय... त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जे काय ठरलंय ते आता सभागृहात सांगू नका... असा सल्ला दिला त्यावर मुख्यमंत्रीही आपले हसू आवरु शकले नाहीत. त्यावर जळगावचेच राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जे काही आहे ते सांगून टाका, त्यावर खडसे यांनी ‘मी पण तेच म्हणतोय, तुमचं काय ठरलंय ते उध्दव ठाकरेंना विचारुन सांगून टाका...’ आणि त्यावर सभागृहात हास्याचा स्फोट झाला.
महाजनांना परिसस्पर्श
गिरीश महाजनांना मुख्यमंत्र्यांचा परिस स्पर्श झाला म्हणून ते इथे आहेत.त्यांना सगळं माहिती असतं असं ते दाखवतात. पण ते काही खरं नसतं, असे अजित पवार म्हणताच विधासभेत जोरदार हास्य फुलले.