मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराजांनी इंदूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. भय्यूजी महाराजांचं राजकीय वर्तुळातील स्थानही मोठं होतं. अनेक राजकीय समेट घडवण्यात, आंदोलकांशी वाटाघाटी करण्याचं काम भय्यूजी महाराजांनी केलं होतं. त्यामुळे सर्वपक्षीय नेते त्यांच्या संपर्कात असायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, गायिका आशा भोसले, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी भय्यूजी महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती. अनेक राजकीय समेट घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसच्या काळात झालेल्या या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका त्यांनी पार पाडली होती. अण्णा हजारेंनी भय्यूजींच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडलं होतं. यामुळे भय्यूजी महाराज चर्चेत आलं होतं. पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सद्भावना उपोषण सुरू केलं होतं. त्यांचं हे उपोषण सोडवण्यात भय्यूजी महाराजांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळेच मोदी यांनी उपोषण सोडताना भय्यू महाराजांना आमंत्रित केलं होतं.