ऑनलाइन लोकमतनवी मुंबई, दि. 28 - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आभार मानले. नवी मुंबई महापालिकेतील भाजप वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची वर्षावरही भेट घेतली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी राज्यपालांची ही मागितली वेळ. मातोश्रीवर गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महापौर सुधाकर सोनावणे ,सभागृह नेते जयवंत सुतार(एन.सी.पी),स्थायी समिती सभापती शिवराम पाटील (शिवसेना),नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत,शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर,जेष्ठ नगरसेवक एम.के.मढवी(शिवसेना),शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांचा समावेश होता. लोकशाही वाचविण्यासाठीच्या लढ्याला यापुढेही पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही अद्याप त्यांची बदली झालेली नाही. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून लोकशाही बचाव मोहीम हाती घेतली आहे. मनमानीपणे काम करणाऱ्या आयुक्तांची बदली होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. याचाच भाग म्हणून महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी काय चर्चा झाली याविषयी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी आयुक्तांनी शहरवासीयांना कसे वेठीस धरले. त्यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय व त्याचे परिणाम, लोकप्रतिनिधींचा कशाप्रकारे अवमान केला जात आहे याविषयी चर्चा करण्यात आली. या आंदोलनाला सेनेचा यापुढेही पाठिंबा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांना जनतेचा पाठिंबा असल्याचे दाखविले जात आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्या समर्थनासाठी काढलेल्या तीन रॅलीसाठी २० ते २५ नागरिकच उपस्थित राहिले. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दडपणाखाली आहेत. अनेकांना हृदयविकाराचा झटका आला आहे. व्यापारी, कामगार, प्रकल्पग्रस्त सर्वच त्रस्त आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्यामुळे त्यांची बदली करणे आवश्यक असल्याची भूमिका अविश्वास ठरावास पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांनी घेतली. तसेच मुंढेंना हटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. या वेळी महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, नामदेव भगत, द्वारकानाथ भोईर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपालांचीही भेट घेणार मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली केलेली नाही. यामुळे लोकशाहीचा अवमान होत आहे. नागरिकांची व लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेऊन त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी नगरसेवक लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहेत. भेटीसाठी वेळ मागितली असल्याचंही सूत्रांकडून समजते आहे.
मुंढेंना हटवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग
By admin | Published: October 28, 2016 9:39 PM