"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 05:53 PM2024-05-28T17:53:51+5:302024-05-28T17:55:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दरवर्षी १० जूनला साजरा केला जातो. परंतु यंदा हा वर्धापन दिन कुणी साजरा करायचा त्यावर अजित पवार गटाने शरद पवार गटाला खोचक उत्तर दिलं आहे. 

Political parties are not private property, Ajit Pawar group targets Sharad Pawar group | "राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा

"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा

मुंबई - पक्षवाढीसाठी ज्यांची नावे घेतली त्यातले ९० टक्के लोक अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नाही. ही लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाकडे रितसर नोंदणी झालेली व्यवस्था असते. राजकीय पक्ष खासगी प्रॉपर्टी असती तर दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी झाली असती असा टोला लगावत राष्ट्रवादी अजित पवार गटाने शरद पवार गटावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलेले असल्यामुळे १० जून हा पक्षाचा वर्धापन दिन आम्ही थाटात साजरा करणारा असल्याची माहिती मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांना दिली. 

उमेश पाटील म्हणाले की, आजही चिन्हाबाबत न्यायालयीन लढाई सुरू असली तरी शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस नावाची पार्टी नाही. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी हे स्वतंत्र वेगळे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. चिन्हदेखील तुतारी दिली आहे त्यामुळे ज्यादिवशी नाव आणि चिन्ह त्यांना मिळाले तो दिवस ते पुढच्या वर्षी पहिला वर्धापन दिन म्हणून साजरा करतील. तो साजरा करण्याचा त्यांना अधिकार आहे. २५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता तो उत्साहात साजरा करेल असं त्यांनी सांगितले. 

सुप्रिया सुळेंना टोला 

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तारीक अन्वर, पी. ए. संगमा आणि प्रफुल पटेल या राष्ट्रीय नेत्यांनी आणि राज्यस्तरावर मधुकर पिचड, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, अजित पवार, सुनिल तटकरे, आर. आर. आबा पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, हसन मुश्रीफ या सर्वांनी पक्ष वाढवला. आज समोरच्या पक्षाकडे ज्या कार्याध्यक्षा आहेत त्या स्थापनेच्या वेळी संस्थापक सुध्दा नव्हत्या असा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळेंना नाव न घेता टोला लगावला. 

दरम्यान, वंशपरंपरेने खासगी प्रॉपर्टी ट्रान्स्फर होते तसा राजकीय पक्ष वंशपरंपरेने ट्रान्स्फर होण्याची व्यवस्था नाही. लोकशाही प्रक्रियेत ज्याच्याकडे बहुमत असते त्यांच्याकडे पक्ष जातो. त्यामुळे बहुमत हे अजित पवार यांच्याकडे आहे. म्हणून आम्ही १० जूनला वर्धापन दिन देश व राज्यस्तरावर साजरा करणार आहे असं उमेश पाटलांनी स्पष्ट सांगितले. 
 

Web Title: Political parties are not private property, Ajit Pawar group targets Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.