गावची होळी घालून झाल्यानंतर मुंबईतली धुळवड आणि राजकीय रंगपंचमी अनुभवण्यासाठी आमचे मित्र बाळा गावकर खास मुंबईत आले होते. राज्याच्या राजधानीतील विविध पक्षांची मुख्यालये आणि नेतेमंडळींच्या निवासस्थानी सुरू असलेल्या रंगपंचमीचा कार्यक्रम पाहून परतल्यानंतर त्यांनी सांगितलेला धम्माल अनुभव येणेप्रमाणे... मुंबईतल्या होळीचा थाट तो काय वर्णावा. जिकडे तिकडे नुसती वेगवेगळ्या रंगांची उधळण! राजधानीला शोभेल असा गोंधळ! त्यातही मुंबई म्हटली की मराठी माणूस आणि शिवसेना यांचं एक वेगळंच नातं म्हणून सर्वात आधी मातोश्रीवरच्या होळीचा उत्सव डोळ्यात साठवण्याच्या इराद्याने आम्ही वांद्रेच्या दिशेने कूच केले. महापालिकेपासून केंद्रापर्यंत सत्तेत असल्याने इथल्या होळीमध्ये उत्साह होता. त्यात चार वर्षे चाललेल्या शिमग्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा युतीचे रंग उधळले गेल्याने येथील धुळवडीचा उत्साह द्विगुणित झालेला दिसत होता. सेनेचे दिल्लीतील मनसबदार पुन्हा एकदा खासदारकी निश्चित झाल्याचे मानून एकमेकांना रंगात न्हाऊ घालत होते. स्वत: पक्षप्रमुख जातीने आगतस्वागत करत होते. युवा आदित्य धनुष्यबाणासाऱखी पिचकारी घेऊन रंगपंचमी खेळत होते. इतर नेते मंडळी त्यांच्याकडून हौशीने रंगवून घेत होती. तर राऊतकाका मी चार वर्षे मीडियात रोखठोक भूमिका घेऊन मोदी शहांच्या नावाने शिमगा केल्याने दिल्लीश्वरांना युती करणे कसे भाग पडले हे ठासून सांगत होते. त्यातच मातोश्रीवरची धुळवड आटोपून युतीच्या संयुक्त रंगपंचमीस जाण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू होती. तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनेही ऐक्य दाखवण्यासाठी एकत्रित होळी साजरी करण्याची जय्यत तयारी केली होती. थोडेसे रुसवेफुगवे असले तरी जो तो एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावत होता. दादा, बाबा, अशोकराव आघाडीच्या रंगात रंगून गेले होते. एकाकी पडलेले विखे साहेब मात्र एका कोपऱ्यात बसून सगळे निर्विकारपणे बघत होते. राष्ट्रवादीचे थोरले साहेब आघाडीच्या धुळवडीस जातीने हजर होते. थोरल्या साहेबांनी लावलेल्या रंगाचा रंग क्षणाक्षणाला बदलत होता. त्यामुळे उपस्थित मंडळी अवाक होत होती. आघाडीच्या धुळवडीसाठी दिल्लीहून हायकमांडने खास विमानांच्या आकाराचे फुगे पाठवले होते. आघाडीचे नेते तिथे ठेवलेल्या एका पुतळ्यावर नेम धरून हे फुगे मारत होते. पण पोरं पळवणारी टोळी आसपास फिरत असल्याने बड्या नेतेमंडळींचा बराचसा वेळ लेकराबाळांवर नजर ठेवण्यात जात होता. मुला-नातवंडांना सांभाळा असे जितेंद्रभाऊ उपस्थिताना माईकवरून वारंवार सांगत होते. एकंदरीत अशा परिस्थितीमुळे आघाडीच्या होळीत काही केल्या म्हणावा तसा रंग भरत नव्हता.
तिकडे शिवाजी पार्कजवळ दोन गुजरात्यांमुळे राजकीय नुकसानी झाल्याने संतप्त झालेले चित्रकार साहेब नुसता शिमगा करत होते. अधुन मधून त्यांच्याकडून होणाऱ्या शाब्दिक रंग उधळणीला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. बाजूला एक रेल्वे इंजिन एकाच जागी उभे राहून नुसतेच धडधडत होते. त्याच्या धुरामुळे वातावरणात एकप्रकारचा कोंदटपणा आला होता. पण हे इंजिन एकदा पळायला लागल्यावर कुणालाही ऐकणार नाही, असे उपस्थित मंडळी म्हणत होती. काही अंतरावर आमचे गाववाले असलेल्या दादांची स्वाभिमानी धुळवड सुरू होती. पण तिकडे घरगुती मंडळीच जास्त दिसत होती. इतर छोट्या मोठ्या मंडळींनीही धुळवडचे कार्यक्रम आयोजित केले होते.
पण खरी धमाल सुरू होती ती केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या धुळवडीत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धुळवडीची खास व्यवस्था केली गेली होती. मुख्यमंत्री देवेनभाऊ, चंद्रकांतदादा वगैरे जातीने लक्ष ठेवून होते. इकडे सगळीकडे चौकीदार उभे केलेले दिसत होते. होळीच्या गाण्याऐवजी 'मै चौकीदार हूँ' म्हणत सगळे नाचत होते. कंबरेला पिस्तुलासारखी दिसणारी पिचकारी खोचलेले डँशिंग खान्देशी गृहस्थ इकडून तिकडून एकेका तरुणाला पकडून आणत त्याला भगव्या रंगात रंगवून काढत होते. त्यात सेनेच्या अर्जुनाने ताणलेला धनुष्यही पुन्हा मागे घेतला गेल्याने निश्चिंत झालेल्या रावसाहेबांच्या चेहऱ्यावर रंग उजळून निघाले होते. तिकडेही युतीच्या संयुक्त धुळवडीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. त्याचे विशेष निमंत्रण घेऊन सुधीरभाऊ मातोश्रीकडे रवाना झाले होते. तर धुळवडीचे किमान धावते निमंत्रण तरी मिळेल या आशेवर असलेले जानकर मामा, आठवले, सदाभाऊ, मेटेसाहेब दरवाजावर घुटमळून जात होते. हे असेच सुरू राहिले तर आम्ही स्वतंत्रपणे धुळवड साजरी करू, असा इशाराच जानकर मामांनी दिला. तर आठवलेंनीही यमक जुळवून शीघ्रकवितेमधून नाराजी व्यक्ती केली. एकंदरीत राजकीय धुळवडीमध्ये मैत्रीच्या रंगांऐवजी एकमेकांच्या नावाने सुरू असलेला शिमगा पाहून हे कधीच सुधरणार नाहीत, म्हणत मी परतीची वाट धरली. बाकीची हकीकत प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेनच! तूर्तास हॅप्पी होली!!!(बुरा न मानो होली है)