राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी राजकीय खलबते; महाविकास आघाडीत रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 02:55 AM2020-03-10T02:55:42+5:302020-03-10T06:55:30+5:30
राऊत पवारांना भेटले; आघाडीत रस्सीखेच, बाळासाहेब थोरातांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट
मुंबई : राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार खलबते सुरू झाली आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी दिल्लीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणूक होत आहे. या सात जागांपैकी सत्ताधारी महाविकास आघाडी चार जागांवर विजय मिळवू शकते. भाजप आणि त्याचे अपक्ष मित्र मिळून दोन उमेदवार राज्यसभेत पाठवू शकतात. पण सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना रणनिती आखावी लागणार आहे.
सातव्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री फौजिया खान यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र या नावास कॉंग्रेसचा विरोध असून ही जागा आपणांस मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर थोरात यांनी सांगितले की, सातव्या जागेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून ही जागा कोणी लढवायची यावर विचार होईल,
असे स्पष्ट केले. दुसरीकडे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी खा. शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांना त्यांनी सांगितले, सातव्या जागेसाठी राष्ट्रवादीने फौजिया खान यांचे नाव जाहीर केले असून ही शिवसेना आणि काँग्रेसकडील अतिरिक्त मतांच्या बळावर ही जागा जिंकता येईल.
कशी असते ही निवडणूक?
विधानसभेतील २८८ सदस्यांचा विचार करता कोणत्याही पक्षाला आपला एक उमेदवार राज्यसभेत पाठवायचा असेल तर त्यासाठी ३७ आमदारांची गरज आहे. भाजपकडे १०५ आमदार असून नऊ अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. उर्वरित २० आमदारांपैकी किमान १५ जण महाविकास आघाडीच्या बाजूने आपले मत टाकण्याची शक्यता आहे.
विधानसभेतील आमदारांच्या मतांच्या आधारावर राज्यसभेत उमेदवार पाठवले जातात. विधानसभेतील आमदार आपल्या पहिल्या पसंतीची मते उमेदवारांना देतात. त्या आधारावर जर निर्णय होऊ शकला नाही. तर उमेदवारांना देण्यात आलेली दुसऱ्या पसंतीची मते विचारात घेतली जातात. महाविकास आघाडी दुसºया क्रमांकाच्या पसंतीच्या मतांच्या आधारे सातवी जागा आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात.
कोण होणार निवृत्त, कोणाला मिळणार संधी?
राज्यसभेतील सध्याचे सदस्य असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजिद मेनन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे अमर साबळे आणि अपक्ष खासदार संजय काकडे हे २ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. यापैकी शरद पवार, रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळणार आहे. मात्र, अमर साबळे यांच्या ऐवजी भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
शिवसेनेकडून धूत यांच्याऐवजी दुसरे नाव पुढे येऊ शकते, तर दलवाई यांच्याबाबतीत कॉंग्रेसने आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. मेनन यांनाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्याऐवजी कोणाला संधी मिळते, याबाबत उत्सुकता आहे. अपक्ष संजय काकडे यांच्या जागेसाठीच राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांचे नाव पुढे आले आहे.