पुणे : कुठल्याही धार्मिक, सामाजिक किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काय काम, असा प्रश्न विचारला जातो. आम्ही मोठे आहोत म्हणून आम्हाला बोलावले जाते, हा समज चुकीचा आहे. देशाची नीती ठरविण्याची महत्त्वाची भूमिका राजकारणी पार पाडत असतात. त्यामुळे विविध क्षेत्रातील परिस्थिती जाणून घेण्याकरिता अशा कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो, अशा शब्दांत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना टोला लगावला. श्री संत गुलाबराव महाराज जीवन शताब्दीनिमित्त श्री संत गुलाबराव महाराज ८ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. डी. वाय पाटील यांना ‘श्री संत गुलाबराव महाराज’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री संत गुलाबराव महाराज समग्र वाङ्मयांपैकी ५ खंडाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. विजय भटकर, स्वागताध्यक्ष खासदार अनिल शिरोळे, संयोजिका उषा काकडे, डॉ. वसंतराव गाडगीळ आणि कार्याध्यक्ष नारायण मोहोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोविंदगिरी महाराज होते. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांच्या भाऊगर्दीबद्दल नेहमीच साहित्य वर्तुळातून टिकेची झोड उठविली जाते, त्याला आपल्या भाषणात सुमित्रा महाजन यांनी एकप्रकारे प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘‘देशाची निती मग ती शिक्षण, उद्योग, धर्म, साहित्य कुठल्याही क्षेत्राची असो, ती ठरविण्याची जवाबदारी राजकीय नेत्यांची असते. देशाचा व्यक्ती चांगला नागरिक कसा होईल, हे पहावे लागते. सामाजिक परिस्थितीची माहिती असावी म्हणून अशा कार्यक्रमांना आम्ही आवर्जून उपस्थित राहतो. यात विशिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तींना बोलवण्यामागे योजनांची घोषणा व्हावी, असा आयोजकांचा हेतू असतोही. मात्र ते समजून घेतले पाहिजे.’’ शिक्षणाचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. अंधश्रद्धा नको पण जीवनात श्रद्धा असली पाहिजे, त्यानेच जीवन समृद्ध होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतश्री गुलाबराव महाराज यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांच्यासारखा महापुरूष जगात शोधूनही सापडणार नाही, असे सांगून गोविंदगिरी महाराज यांनी भविष्यात जगाचे ‘बायबल’ हे भगवद्गीता असेल, असे भाकितही वर्तविले. प्रास्ताविक नारायण मोहोड यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनापूवी ग्रंथदिंडी काढण्यात आली. (प्रतिनिधी) ४ब्रिटिीशांनी १८५७च्या उठावाला ‘बंड’ असे नाव दिले आणि तेच आज रूढ झाले. हा शब्द इंग्रजींना आणला, पण आपण तेच म्हणत आहोत हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला ‘स्वातंत्र्यसमर’ म्हटले पाहिजे, असे सांगितले. आपल्याच इतिहासाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, अशी खंतही सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली.जगातील ज्ञानाधिष्ठित संस्कृती कोणती असेल, तर ती भारतीय संस्कृती. आज धर्माच्या नावावर युद्ध आणि अतिरेकीवाद फोफावत चालला आहे, जो विचार करायला लावणारा आहे. देशाची संस्कृती विशाल आहे, ती कशामुळे आहे हे राजकारण्यांना समजायला हवे.- डॉ. विजय भटकर, संमेलनाध्यक्ष