यवतमाळ -राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. ते 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. जेथे संवाद होत नाही तेते विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे मतभिन्नता असली तरी मनभिन्नता असता कामा नये, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावरून राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना साहित्य संमेलनात उदभवलेल्या वादासह विविध विषयांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले, ''राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे.''
तसेच मतभिन्ना असावी मात्र मनभिन्नता असू नये, आपल्याला विरोध करणाऱ्याचाही सन्मानच केला पाहिजे असा सल्लाही गडकरींनी दिला. ''जिथे संवाद होत नाही तिथे विसंदवाद होते, त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांच्या मर्यांदा सांभाळून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मतभिन्नता असली पाहिजे. पण मनभिन्नता असता कामा नये.'' असे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी नयनतारा सहगल यांच्यावरही नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला. ज्यांना आपण मोठे समजतो. त्यांच्याजवळ जाऊन आल्यावर आपण समजतो तेवढे ते मोठे नाहीत हे लक्षात येते. पण ज्यांना लहान समजतो त्यांच्या जवळ गेल्यावर ते खूप मोठे आहेत. हे लक्षात येते. वैशालीताईंना तुम्ही बोलावले हे चांगले केले. जीवनाच्या संघर्षामध्ये आत्मविश्वासाने कसे जगायचे हे दाखवून दिले आहे.'' असे गडकरींनी सांगितले.