Politics: अजितदादांची दिलदारी.. चंद्रकांतदादांची सहनशीलता !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 10:54 AM2021-10-14T10:54:38+5:302021-10-14T10:55:32+5:30

Maharashtra Politics: ‘पॉलिटिकल बिगबॉस’मध्ये एकमेकांचं कौतुक करण्याचा टास्क दिला गेल्यावर मोठीच पंचाईत झाली. पण सगळे सराईत, कोण मागे हटेल?

Politics: Ajit Pawar's kindness .. Chandrakant Patil's tolerance! | Politics: अजितदादांची दिलदारी.. चंद्रकांतदादांची सहनशीलता !

Politics: अजितदादांची दिलदारी.. चंद्रकांतदादांची सहनशीलता !

Next

- सचिन जवळकोटे
(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)

पृथ्वीवर महाराष्ट्र देशी ‘पॉलिटिकल बिग बॉस’ चा नवा खेळ रंगल्याची वार्ता नारदमुनींपर्यंत पोचली. ‘पॉलिटिकल बिगबॉस’मध्ये एकमेकांचं कौतुक करण्याचा टास्क दिला गेलाय आणि त्याची सुरुवात थेट राैतांनी केलीय हे, कळल्यावर तसे ते अस्वस्थ झाले. रौतांना अचानक प्रियंका गांधींमध्ये त्यांच्या आजीचा भास होतो?, हा काय प्रकार आहे हे पाहिलंच पाहिजे म्हणून त्यांनी थेट देवेंद्राना गाठलं. त्यांच्या कानी ही वार्ता घातली.
इंद्रांनी तत्काळ आदेश दिला, ‘मग शोध घ्या मुनी या नेत्यांचा. कोण कुणावर कौतुकाची किती उधळण करू लागलाय?’ 
पडत्या फळाची आज्ञा स्वीकारत नारद थेट भूतलावर पोहोचले. तिथं समजलं की, ‘पॉलिटिकल बिगबॉस’च्या स्टुडिओत कैक नेते एकत्र राहताहेत. सकाळी गुडीगुडी चहा पिताहेत. लंचला एकमेकांच्या ताटात संशयाचं मीठ पसरताहेत. संध्याकाळी ‘हेट टी’चा प्रोग्राम रंगवताहेत. डिनरला तर एकमेकांचे कान भरवून स्वत:चं पोट भरताहेत.
नारदांनी गुपचूपपणे आत प्रवेश केला. ‘बिगबॉस’चा आवाज हॉलमध्ये घुमत होता, ‘आजचा टास्क नीट ऐकून घ्या. आज प्रत्येकानं अशा नेत्याचं कौतुक करायचं, ज्यांच्याशी तुमचं बिलकुल पटत नाही’ मग काय..एकेकजण उठून कौतुकातून चिमटे काढू लागले.
सुरुवातीला किरीटभाई बोलू लागले, परंतु त्यांचा आवाजच ऐकू येईना. तेव्हा मलिकभाईंनी टोमणा मारला, ‘ या सोमय्यांसमोर कुणीतरी कॅमेरा उभा करा रेऽऽ त्याशिवाय त्यांचा आवाज मोठा नाही व्हायचा’.. मात्र ऐकून न ऐकल्यासारखं करत किरीटभाई अजितदादांबद्दल सांगू लागले, ‘या जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे आमचे दादा. मात्र ते एवढ्या मोठ्या मनाचे की, त्यांनी आपले कारखाने दुसऱ्यांच्या नावावर ठेवले. मालकी हक्काचा मोहसुद्धा दाखवला नाही ‘ 
मग, जितेंद्रभाई नेहमीच्या तावातावानं बोलू लागले, ‘आम्ही राजकारणी तसे कठोर. भावनाशून्य. मात्र फडणवीसांसारखा भावनिक अन् स्वप्नाळू नेता मी आजपर्यंत कधीच बघितला नाही. कधीतरी पहाटे गुपचूप घेतलेल्या शपथेला जागणारी त्यांची ग्रेट पर्सनॅलिटी.. म्हणूनच दोन वर्षांनंतरही त्यांना अजून सीएम असल्यासारखंच वाटतं.’
तिसरा नंबर होता नारायणदादांचा. उद्धवांकडे बघत ते बोलू लागले, ‘माझं लेकरू जेवढं ट्वीटरवर खिळलेलं असतं, त्याहीपेक्षा जास्त यांचं लेकरू पेंग्विनमध्ये रमलेलं. व्वाऽऽ किती छान हे पर्यावरण प्रेम. लोक टीका करतात की, उद्धवांचं सरकार बारामतीकरांच्या इशाऱ्यावर चालतं. मात्र तसं नाही. उद्धवांचं राजकारण रौतांना तर, सोडाच नार्वेकरांनाही कधी कधी समजत नाही. एक ना एक दिवस ते थोरल्या काकांच्या पार्टीलाही पुरतं कामाला लावतील. लिहून घ्या.’
हे ऐकताच पटोले नाना दचकले ; कारण घड्याळ्याचे काटे उलटे फिरविण्याची जबाबदारी श्रेष्ठींनी त्यांच्यावरच सोपवलेली. आपलं मिशन ‘उद्धव’च करतील की काय, ही भावना लपवत त्यांनी चंद्रकांतदादांचं तोंडभरून कौतुक केलं, ‘पाटलांसारखा संयमी नेता आजपर्यंत पाहिलेला नाही. त्यांच्याच गावात त्यांना येऊ दिलं जात नाही, तरीही ते शांत. अध्यक्ष असूनही बरेच निर्णय परस्पर नागपुरातून घेतले तरीही ते स्थितप्रज्ञ. व्वाऽऽ किती हे पेशन्स.’ 
शेवटचा क्रमांक होता राज यांचा. काळ्या फ्रेमच्या चष्म्यातून कॅमेऱ्याकडे निरखून बघत त्यांनी अगोदर दीर्घ पॉज घेतला. मग खर्जातल्या आवाजात बोलायला सुरुवात केली, ‘आजपर्यंत मी साऱ्यांचं कौतुक केलं. पण, ती लगेच कौतुकमूर्ती बदलत गेली. माझ्या कौतुकानं माणसं बिघडायची की, त्यांचे अवगुण मला उशिरा समजायचे, कुणास ठाऊक. मात्र आज मी खुद्द बिगबॉसचंच कौतुक करणार.’ 
हे ऐकताच ‘बिगबॉस’चा आवाज घुमू लागला. ‘नो..नो.. हे नियमाच्या बाहेर आहे. असं झालं तर, तुम्हाला बिगबॉसमधून आऊट व्हावं लागेल’
 हे ऐकताच चिडलेल्या ‘राज’नी शेवटचा हुकुमी पत्ता काढला, ‘तुमचं बिग बॉस हे नावच अमराठी आहे. बिलकुल चालणार नाही माझ्या राज्यात,’
मग काय. बाहेरून जोरात खळखट्यॅऽऽकचा आवाज आला. कॅमेरे तुटले की, स्क्रिन फुटलं, माहीत नाही...नारद मुनींना पुढचं काहीच दिसेना. त्यांनी ‘बिगबॉस’च्या सहनशीलतेचं मनापासून कौतुक करत घाईघाईनं काढता पाय घेतला. नारायणऽऽ नारायणऽऽ.

Web Title: Politics: Ajit Pawar's kindness .. Chandrakant Patil's tolerance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.