शिरोळ (जि. कोल्हापूर) : साखर उद्योग सध्या अडचणीतून चालला आहे, साखर निर्यातीचे धोरण राबविले पाहिजे, त्याशिवाय बाजारभाव सुधारून ऊस उत्पादकांना दर मिळणार नाही. शेतीवर परिणाम होणारे राजकारण करू नका, उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्यांच्या विकासासाठी दिशा देणारे राजकारण करूया, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते. पवार म्हणाले, आज साखर कारखानदारीसमोर मोठे प्रश्न उभे आहेत. ब्राझील, इस्रायल, इंडोनेशिया यासारख्या देशातील साखर उत्पादन व ऊस दर याचा विचार करता आपल्या देशातही आधुनिक तंत्रज्ञान राबविण्याची गरज आहे. देशात गरजेपेक्षा साखरेचे उत्पादन वाढले आहे. साखर निर्यातीशिवाय बाजारभाव सुधारणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकार टिकला पाहिजे ही शासनाची भूमिका असून, शासनाने साखर उद्योगाला अडचणीच्या काळात मदतच केली आहे. कारखाने टिकले तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत. ज्यांनी संस्था मोडल्या त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या भूमिकेवर शासन ठाम आहे.
राजकारणाचा शेतीवर परिणाम नको
By admin | Published: January 18, 2016 3:44 AM