चकमक झडली : शाळेत उर्दू भाषा शिकवण्याचा मुद्दा
मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजपात शाळेमध्ये उर्दू भाषा शिकविण्यावरून चकमक झडली. महसूल व अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या, मराठी शाळेत उर्दू भाषा शिकविण्याच्या भूमिकेचा निषेध करीत शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी खडसेंना भेट म्हणून हिरवी टोपी आणली.
कोणीही मागणी केलेली नसताना खडसे यांनी ही भूमिका मांडली आहे. मराठी शाळांमध्ये एक जरी मुस्लीम विद्यार्थी शिकत असेल, तर तिथे उर्दू शिक्षक नेमावा लागेल. त्याच्या नमाजाची व्यवस्था करावी लागेल, असा दावा रावते यांनी केला. मुळात त्यांचा आणि शिक्षण विभागाचा काहीच संबंध नसताना खडसेंनी हे वक्तव्य केले आहे. याचा निषेध म्हणून त्यांना हिरवी टोपी भेट देण्यासाठी आणल्याचे रावते म्हणाले. रावते यांच्या टोपीप्रकरणाचा भाजपा नेत्यांनी निषेध केला. विरोध करण्याचीसुद्धा एक संस्कृती असते. दिवाकर रावते यांनी ती पाळायला हवी होती, असे सांगत भाषा आणि धर्म एक करता येणार नाही. सर्वाना सोबत घेत विकास करण्याच्या मोदी मंत्रवरच राज्य सरकार वाटचाल करेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)
आधी विषय समजून घ्या - खडसे
अल्पसंख्याकमंत्री म्हणून ही भूमिका मांडली. मराठीसोबत हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड अशी अन्य एखादी भाषा ऐच्छिक म्हणून घेता येते. यात उर्दूचाही समावेश करण्याचे मी म्हटले तर गैर काय, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनीही शिवसेनेच्या टोपी प्रकरणावर टीका केली. जनतेने विकासासाठी तुम्हाला निवडून दिले आहे. असे टोपी प्रकरण करायचे असेल तर विधान भवनात कशाला येता, असा टोला जलिल यांनी हाणला.