मुंबई : त्रिपुरातील कथित धार्मिक हिंसाचारावरून राज्यात शुक्रवारी बंददरम्यान ज्या हिंसक घटना घडल्या त्याविरोधात राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदवेळी अमरावतीत शनिवारी पुन्हा हिंसाचार होऊन संचारबंदी लावण्यात आली. त्यानंतर राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. नांदेडमध्ये तीनशे जणांवर गुन्हे शुक्रवारी नांदेड बंददरम्यान करण्यात आलेल्या दगडफेक व वाहने जाळपोळ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांत तीनशे जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत तर दहाहून अधिक जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू होती. शहराच्या विविध भागात लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे, व्हिडीओवरुन आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. रझा ॲकॅडमीच्या आयोजकांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
मालेगावमध्ये दहा अटकेत, ५०० जणांविरुद्ध गुन्हामालेगाव : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या शुक्रवारच्या बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व मालमत्तेच्या नुकसानीचे प्रकार घडले. या प्रकरणी हुल्लडबाजी करणाऱ्या ४०० ते ५०० जणांविरुद्ध विनापरवाना मोर्चा व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहा जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी परिस्थिती नियंत्रणात होती. पूर्व व पश्चिम भागात व्यवहार सुरळीत होते. दगडफेकीच्या घटनेतील संशयित आरोपींमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी पोलीस नियंत्रण कक्षात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी दंगलीचे कारस्थान - राऊत औरंगाबाद : महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. फालतू विषयांवर लोकांची दिशाभूल करण्याचे राजकारण असून, महाराष्ट्रात दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारस्थान चालू आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. सरकार पाडण्याच्या तुम्ही कितीही तारखा देत राहा, आमचे सरकार २५ वर्षे राहील, असे ते म्हणाले. महागाईविरोधातील शिवसेनेनेच्या मोर्चाला ते संबोधित करीत होते.विघ्नसंतोषींकडून दंगली घडविण्याचे काम : अजित पवारजाती-धर्माचे राजकारण न करता सर्वांनी एकोप्याने रहावे. हिंसाचारात गरिबांचे नुकसान होते. कोरोना, नैसर्गिक आपत्ती या घटनेला महाविकास आघाडी सरकार यशस्वी तोंड देऊन उभारी घेत असताना काही विघ्नसंतोषी लोकांना ते बघवत नाही. राज्यात दंगली घडविल्या जात आहेत. सर्वानी शांतता राखावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जामखेड (जि. अहमदनगर) येथे केले.