मुंबई : मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या सुशोभिकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त निलोत्पल हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.मुंबई पोलिसांच्या पथकाने मरिन लाइन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन या कबरीभोवती लावण्यात आलेले एलईडी लाइट काढले. या सुशोभिकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. या सुशोभिकरणाची परवानगी कोणी दिली होती, केव्हा दिली होती याचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजप धार्मिक वातावरण बिघडवत आहे. दहशतवादी अफजल गुरू आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी दफन केले. अतिरेक्यांचे समाजात उदात्तीकरण होऊ नये म्हणून काँग्रेसने खबरदारी घेतली होती. याकूबबाबत ही खबरदारी तत्कालीन भाजप सरकारने घेतली नाही.- अतुल लोंढे, प्रवक्ता, प्रदेश काँग्रेस
महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले. हेच तुमचे मुंबईवरचे प्रेम का? या कृत्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना हे सुशोभीकरण झाले.- राम कदम, आमदार, भाजप
दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देत नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारने याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला? याकूब मेमनच्या कबरीचा आणि पालिकेचा काहीही संबंध नाही. ती जागा खासगी ट्रस्टची आहे. याकूबची अंत्ययात्रा अन् अंत्यसंस्काराची परवानगी भाजपचे सरकार असताना दिली गेली.- आदित्य ठाकरे, युवा सेनाप्रमुख