धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 02:13 PM2024-05-01T14:13:24+5:302024-05-01T14:13:45+5:30
Dhule Lok sabha Election Politics: महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
राजकारणात कधी काय होईल नेम नाही. एकीकडे विरोधक उमेदवार गायब होत आहेत. विरोधक उमेदवार आपला अर्ज मागे घेत आहेत व आघाडी किंवा युतीला पाठिंबा जाहीर करत आहेत. अशातच धुळ्यात ज्यांच्या उमेदवारीविरोधात एकत्र येत तिसरी आघाडी उभी केली परंतू ऐन मोक्याच्या क्षणी त्या उमेदवारालाच पाठिंबा जाहीर केल्याचा प्रकार घडला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी हजेरी लावली होती. भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आपण हा पाठिंबा देत असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले.
धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाली होती. यानंतर काँग्रेसमधून नाराजी नाट्य समोर आले होते. काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन केली होती. स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला होता. मात्र काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आले होते. यानंतर गोटे यांनी तिसऱ्या आघाडीतून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. आपण भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना पाठिंबा देत असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले. धुळे शहरातून एक लाखांचा लीड मिळवून देऊ असा विश्वास अनिल गोटे यांनी व्यक्त केला. गोटे येत्या 8 मे रोजी जाहीर सभा देखील घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.