मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही त्यांना राज्य सरकारने अभय दिले. त्याचवेळी मंत्रिपदावर असलेल्या एका भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आर-मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हीच संधी साधत शिवसेनेने विरोधी पक्षांच्या मदतीने भाजपाला लक्ष्य केले आहे. या अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक शनिवारी आर-मध्य विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहेत.बोरीवली येथील आर-मध्य विभागातील साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन (पूर्व उपनगरे) येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गांधी यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांची बदली केली. त्यांचे आतापर्यंतचे काम समाधानकारक असून, ते प्रामाणिक अधिकारी असल्याने त्यांच्या बदलीने नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याविरोधात मनसेचे नगरसेवक चेतन कदम, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, शुभा राऊळ, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादीच्या संध्या दोषी, काँग्रेसचे शिवानंद शेट्टी यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन गांधी यांच्या बदलीबाबत विचारणा केली.या चर्चेत आयुक्तांनी गटनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. डोंगरी एक्सल येथील पालिकेच्या प्लॉटवरील अनधिकृत बांधकामावर गांधी यांनी कारवाई केल्यानेच भाजपाच्या एका नेत्याच्या दबावामुळे त्यांची बदली झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे. एका आमदाराच्या दबावामुळे कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतील तर हा त्यांचा मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे, असा टोला शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी लगावला आहे. (प्रतिनिधी)
साहाय्यक आयुक्तांच्या बदलीवरून राजकारण तापले
By admin | Published: November 05, 2016 4:54 AM