ठाणे : ठाणे व पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता शुक्रवार, ३ जून रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे हे पाचव्यांदा आपले नशीब आजमावत असून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी त्यांना कडवे आव्हान दिले आहे. सात महापालिका, दोन नगरपालिका यामधील एकूण १०६० मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. एकूण १३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता निवडणूक आयोगाने कठोर उपाययोजना केल्या आहेत.डावखरे यांना काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला असल्याने त्यांच्याकडे ४२१ मते आहेत. शिवसेना, भाजपा यांची मिळून ४९१ मते आहेत. विजयी उमेदवाराला ५३१ मतांची मॅजिक फिगर गाठावी लागणार असल्याने मनसे, छोटे पक्ष व अपक्ष यांच्या १०८ मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मते फुटू नयेत, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादीने आपले नगरसेवक अलिबाग व लोणावळा येथे, तर शिवसेना-भाजपाने आपले नगरसेवक गोव्यात नेऊन ठेवले आहेत. सोमवार, ६ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय, व्हिडीओ चित्रीकरणासह सीसीटीव्हींची करडी नजर या केंद्रांवर असणार आहे.या निवडणुकीत ठाणे मतदान केंद्रावर सर्वाधिक १३३ जणांचे मतदान असून सर्वात कमी मतदान जव्हार, मुरबाड व शहापूर येथे प्रत्येकी १९ मतदारांचे आहे. (प्रतिनिधी)डावखरेंची ही शेवटची निवडणूक ठरणार - दानवेठाणे : ‘राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांची ही शेवटची निवडणूक आहे, हे आपल्यालाच त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे,’ असे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काढले. फाटक यांच्या प्रचारासाठी दानवे बुधवारी रात्री ठाण्यात आले होते. त्यांनी शिवसेना, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या उमेदवाराला मते दिली नाहीत, तर राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा जो इशारा दिला आहे, तो गांभीर्याने घेण्याची आठवण दानवे यांनी करून दिली.
विधान परिषदेसाठी आज मतदान
By admin | Published: June 03, 2016 3:31 AM