ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - राज्यातील विविध 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे केली.
सहारिया यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा एकूण 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. 5 ते 12 मे 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नित्रंणाखाली मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत. नामनिर्देनपत्रांची 15 मे 2017 रोजी छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 17 मे 2017 पर्यंत राहील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 27 मे 2017 रोजी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मतदान होईल. केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 29 मे 2017 रोजी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले. जिल्हानिहाय सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या: ठाणे- 4, पालघर- 26, नाशिक- 4, अहमदनगर- 1, पुणे- 22, सातारा- 10, सोलापूर- 4, सांगली- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, उस्मानाबाद- 1, जालना- 2, वाशीम- 1 व चंद्रपूर- 1. एकूण- 80.
जिल्हानिहाय पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या (कंसात रिक्त पदांची संख्या): ठाणे- 99 (212), पालघर- 66 (132), रायगड- 60 (75), रत्नागिरी- 187 (247), सिंधुदुर्ग- 38 (65), नाशिक- 218 (348), जळगाव- 110 (162), नंदुरबार- 49 (63), पुणे- 359 (603), सातारा- 48 (81), सांगली- 105 (170), कोल्हापूर- 77 (100), औरंगाबाद- 102 (120), नांदेड- 109 (160), उस्मानाबाद- 49 (74), जालना- 73 (86), लातूर- 45 (53), अमरावती- 89 (105), यवतमाळ- 116 (150), बुलडाणा- 72 (88), नागपूर- 46 (84) वर्धा- 63 (87), चंद्रपूर- 46 (80), भंडारा- 60 (103) व गडचिरोली- 154 (451). एकूण- 2440 (3909)