ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील पाच नगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून औरंगाबादमध्ये पहिल्या दोन तासात ११ टक्के तर नवी मुंबईत १३ टक्के मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असून संध्याकाळी साडेपपाच पर्यंत मतदान करता येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलिस बंदबोस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये माजी आमदार व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी मतदानाचा हक्क बजावत सर्व नागरिकांना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले. तर नवी मुंबईत गणेश नाईक यांनी सहकुटुंब मतदान करत जनता विकासाच्या बाजून मतदान करून आपल्यालाच पुन्हा निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. उद्या मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येईल.
औरंगाबाद महापालिकेत दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १११ जागांसाठी, तर नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया होत आहे. औरंगाबादेत ९०४ व नवी मुंबईत ५६८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील वाडी, मोवाड, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-कुळगाव व अंबरनाथ या पाच नगरपालिकांसाठीही आज मतदान होत आहे़.