- रवींद्र देशमुख, सोलापूर
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कौल देऊन जे परिवर्तनाचे वारे वाहायला लागले ते आता स्थानिक पातळीपर्यंत पोहोचलेले आहे, हे सोलापूर महापालिकेच्या निकालावरूनही सिद्ध झाले. भाजपाने विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख या मंत्रीद्वयींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली खरी; पण परिवर्तनाचे हे वारेच पक्षाला सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेले. १०२ सदस्यांच्या सभागृहात ४९ जागा जिंकून भाजपा मॅजिक फिगर ५२च्या अगदी जवळ पोहोचली आहे. सत्ता स्थापनेसाठी केवळ तीन जागांची भाजपाला गरज आहे. परिवर्तनाच्या लाटेत काँग्रेसचा प्रभावी प्रचार कुचकामी ठरला. ‘एमआयएम’ने मात्र ९ जागा जिंकत ‘इंद्रभुवना’त लक्षवेधी प्रवेश केला आहे.काँग्रेसने राष्ट्रवादीशी काडीमोड घेतल्यानंतर प्रभावी प्रचार केला. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मोठ्या प्रचारसभा झाल्या. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आठ-दहा दिवस मुक्काम करून सोलापूर पिंजून काढले. काँग्रेसने केलेल्या कामांची यादी मतदारांपुढे मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातीपासूनच पराभूत मानसिकता होती. त्यांना सर्व १०२ उमेदवारही मिळाले नाहीत.शिवसेना महेश कोठे आणि पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली लढली. ‘कोठे फॅक्टर’मुळे पक्षाच्या जागा ९वरून २१पर्यंत गेल्या. ‘एमआयएम’ने मात्र आश्चर्यकारक यश मिळविले. ३२ वर्षांनंतर झालेले सत्तांतर खऱ्या अर्थाने मतदारांच्या परिवर्तनवादी मानसिकतेतूनच झाल्याचे स्पष्ट होते.सत्तेची समीकरणे कशी जुळणार?भाजपाला सत्तेसाठी तीन जागांची गरज आहे. सत्तेसाठी ते कोणते समीकरण मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकही अपक्ष निवडून आलेला नाही. राष्ट्रवादीने चार जागा जिंकलेल्या आहेत. ‘एमआयएम’ व भाजपा युतीची शक्यता व्यक्त करण्याचे धाडस कोणीही व्यक्त करीत नाही. या स्थितीत शिवसेना-भाजपा सत्तेसाठी एकत्र येतील, असा तज्ज्ञांचा होरा आहे.