मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. परिसरातील काही केंद्रांना पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मुस्लिम परिसरातील मतदानकेंद्रांवर मतदानासाठी यंदा महिलांची गर्दी सुद्धा लक्षणीय ठरली.मंगळवारी सकाळी ७.३० पासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ८ ते १० दरम्यान मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर बऱ्यापैकी गर्दी होती. मात्र ११ ते १ दरम्यान ही गर्दी ओसरली. पुन्हा २ वाजतानंतर गर्दी बघावयास मिळाली. महापालिका, पोलीस प्रशासन दप्तरी संवेदनशिल आणि अतिसंवेदनशील अशी नोंद असणाऱ्या मतदानकेंद्रांवर सोमवारी रात्रीपासूनच राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. मुस्लिम व हिंदू वस्त्यांच्या सीमेवरील मतदानकेंद्रांना प्रशासनाने लक्ष्य केले होते. मुस्लिमबहुल भागात जमील कॉलनी, छायानगर व अलिमनगर यातीन प्रभागात १२ जागांसाठी एकूण ...मुस्लिम सदस्य रिंगणात आहेत. या भागात सहा मतदानकेंद्र संवेदनशिल असून यात जमील कॉलनीस्थित महापालिका शाळा, गवळीपुरा येथील अॅकेडेमिक हायस्कूल, शासकीय विद्यानिकेतन, रतनगंज येथील हिंदी प्राथमिक शाळा, असोसिएशन बॉईज हायस्कूल व अल्लामा इंग्लिश स्कूलचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाने शेख जफर विरुद्ध सोहेल बारी, आसिफ तव्वकल विरुद्ध गफफार राराणी, अहमद पत्रकार, अब्दुल रफिक व एजाज पहेलवान यांच्यातील लढत तर इमरान अशरफी विरुद्ध अफजल हुसेन या तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीकडे लक्ष ठेऊन होते. मतदारांना आमिष दाखविल्याप्रकरणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. जमील कॉलनी महापालिका शाळेच्या बाहेर दुपारी काही उमेदवारांचे समर्थक समोरासमोर आले होते. पण, पोलीस पोहोचताच कोणीही दिसून आले नाही. यापरिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पार्टी, बसपा, युवा स्वाभिमान पार्टी, मुस्लिम लिग, राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये जोर दिसून आला. सायंकाळी ४ वाजेनंतर मतदानकेंद्रांवर एकच गर्दी उसळली होती. परिसरात स्थिती नियंत्रणात ठेवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. मुस्लिम भागातील मतदार यादीत त्रुटी ४मुस्लिमबहुल भागातील तीन प्रभागातील मतदारयादीत प्रचंड त्रुटी असल्याची ओरड मतदारांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. झोननिहाय मतदारयादी तयार करताना एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जोडताना अनेक नावे भलत्याच प्रभागात गेल्याचे दिसून आले. व्हॉट्सअप किंवा महापालिका वेबसाईटवरही मतदारयादी सदोष असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. मतदारयादीत त्रुटी असल्याने मुस्लिमबहुल भागातील मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचा आरोप अब्दुल रफिक, सलिम खान यांनी केला आहे.
मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान
By admin | Published: February 22, 2017 2:21 PM