- अतुल कुलकर्णी मुंबई : लोकसभेची निवडणूक जाणीवपूर्वक राष्ट्रवादावर नेण्यात आली मात्र आता येणाऱ्या विधानसभेची निवडणूक राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारावर होईल. क्लीन चीट देण्याने मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार थांबत नाही. एमपी मिल कंम्पाऊंड प्रकरणाचा अहवाल दाबून ठेवला गेला, सिडकोचा भूखंड घोटाळा आम्ही समोर आणला, त्यावर कारवाई झाली नाही, असे गंभीर आक्षेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवले. त्यांच्याशी झालेली ही बातचित.राज्यात आता काँग्रेसची अवस्था काय आहे?पक्षात निराशेचे वातावरण आहे. पण दिल्लीतून राज्यातले निर्णय जाहीर होणे सुरु झाले आहे. आम्हाला लगेच कामाला लागावे लागेल. राष्ट्रवादीसोबत बसून जागा वाटपाबद्दलचे निर्णय घ्यावे लागतील. वंचितमुळे भाजप सेनेचा फायदा झाला हे जनतेला कळून चूकले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता पुन्हा त्या प्रलोभनात फसणार नाही. आम्ही देखील वंचितच्या कार्यकर्त्यांना आमच्यासोबत घेण्याची भूमिका घेतली पाहिजे.विधानसभा निवडणुकीत तुमचा रोख कोणावर असेल?लोकसभेत मोदींना मदत केली गेली पण राज्यात लोक भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या कारभारावर त्रस्त आहेत. ५ वर्षांत झालेल्या कामगिरीवर ही निवडणूक होईल. आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे वारंवार समोर आणली आहेत. पण त्यांना क्लीन चीट देण्या-पलिकडे काही झाले नाही, ते मुद्दे पुन्हा जनतेसमोर आणू.सरकार तर चांगले काम करताना दिसत आहे, असे सगळे म्हणतात. ते कोणत्या मुद्द्यांवर गप्प आहेत?प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी ठपका ठेवला. तो अहवाल आणि त्यावरचा एटीआर मंत्रिमंडळापुढे अद्याप आणलेला नाही, तो विधानसभेतही आणला जाणार नाही. हे मुद्दाम केले जात आहे. सिडकोच्या मालकीचा भूखंड खासगी विकासाला महसुली जमीन म्हणून वाटप केला गेला. आजच्या दराने १७०० कोटींची जमीन तेव्हा फक्त १५ कोटींत दिली. आम्ही हा विषय पुढे आणल्यानंतर तो रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली पण अद्याप त्याचे आदेश काढलेले नाहीत. महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा वॉटर प्युरीफायर घोटाळा, त्याची फाईल अजूनही माहिती अधिकारात दिली जात नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर सेबीने ताशेरे ओढले, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यावर सीबीयआचा खटला होता, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा एमआयडीसीतील जमीन घोटाळा असे विषय आता आम्ही पुन्हा समोर आणणार आहोत.मनसेला सोबत घेणार का?काँग्रेसमधील काही घटकांनी लोकसभेच्यावेळी वेगळी भूमिका घेतली. आता त्यांचे मतपरिवर्तन झाले आहे. मनसेला विरोध करणाऱ्यांनाच राज यांच्या सभा हव्या होत्या, आता तो इतिहास झाला. मनसेला सोबत घेण्याविषयी आमच्या भूमिका काय आहेत, यापेक्षा राज ठाकरे यांचीही भूमिकाही महत्त्वाची आहे. ते काय विचार करत आहेत हे ही पहावे लागेल.
भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या कारभारावर होईल विधानसभा निवडणूक- पृथ्वीराज चव्हाण
By अतुल कुलकर्णी | Published: June 16, 2019 4:02 AM