मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच आघाडी विरुद्ध भाजप असा सामना विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीत रंगणार आहे. आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपसमोर मोठे आव्हान असेल. ही निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून गेले होते. त्यांनी साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील (राष्ट्रवादी) यांचा पराभव केला होता. चंद्रकांत पाटील गेल्यावर्षी विधानसभेवर निवडून गेल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी अशा दिग्गजांनी येथून दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केले. सध्याचे आमदार अनिल सोले हे भाजपचे नागपूरचे महापौरही राहिले आहेत. भाजप यावेळी कोणाला संधी देणार या बाबत उत्सुकता असेल. महाविकास आघाडीचा एकत्रित उमेदवारच भाजपसमोर आव्हान उभे करू शकेल. अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिक्षक आघाडी श्रीकांत देशपांडे यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांचा पराभव केला होता. शेळके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. यावेळी भाजप काय भूमिका घेणार व काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचा एकच उमेदवार असेल का या बाबत उत्सुकता राहील. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळाली तर भाजपची वाट खडतर होऊ शकते. पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे दत्तात्रय सावंत यांनी राज्य शिक्षक परिषदेचे भगवानराव साळुंके यांचा पराभव केला होता. सावंत यांना राष्ट्रवादीचा तर साळुंके यांना भाजपचा पाठिंबा होता.
असा असेल निवडणूक कार्यक्रम अधिसूचना व उमेदवारी अर्ज दाखल करणे ५ नोव्हेंबर २०२० उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १२ नोव्हेंबरउमेदवारी अर्जांची छाननी १३ नोव्हेंबरअर्ज माघार घेण्याची मुदत १७ नोव्हेंबरमतदानाची तारीख व वेळ १ डिसेंबर, स. ८ ते सायं. ५मतमोजणी व निकाल ३ डिसेंबर