प्रज्ञा केळकर-सिंग/ सायली जोशी-पटवर्धन, पुणेसर्वांत स्वच्छ हवामानामुळे ‘निवृत्तांचे शहर’ असा नावलौकिक मिळविलेल्या पुणे शहरात वाढत्या दुचाकींमुळे हवामानातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे़ दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरणात धूलिकणांचे प्रमाण अधिक असून, त्याचा श्वसनाच्या विकाराचा धोका उद्भवू शकतो़, अशी बाब ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आली आहे. १५ वर्षांपेक्षा जुनी सुमारे ९ लाखांहून अधिक वाहने पुण्याच्या रस्त्यांवरून धावत असल्याने हवामान ‘धोक्याची घंटा’ वाजवत आहे. वाढते प्रदूषण आणि त्यात धुक्याची भर, यामुळे राजधानी दिल्ली अत्यंत खराब हवामानाचा सामना करत असून, शहराची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे. दाट धुके आणि प्रदूषणाचे मिश्रण (स्मॉग) सर्वसाधारण हवेच्या तुलनेत १५ पट झाले असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहराची पाहणी केली असता, पुण्याच्या हवेत धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. वाढत्या धूलिकणांमुळे हवेच्या प्रदूषणात भर पडत असून, श्वसनाच्या विकारांचा धोका उद्भवला आहे. पूर्वीपासून दमा, न्यूमोनिया, ब्राँकायटिस असे आजार असणाऱ्या रुग्णांनी तसेच लहान मुलांना या वातावरणाचा सर्वाधिक त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे.शहरामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी (आयआयटीएम) तर्फे शिवाजीनगर, टिळक चौैक इत्यादी ठिकाणी हवामान तसेच प्रदूषणाची स्थिती दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वारगेट, नळस्टॉप, कर्वेनगर आदी ठिकाणी अँबियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड मॉनिटरिंग सिस्टिम बसवण्यात आल्या आहेत. या डिजिटल फलकांच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता, पूर्वानुमान आणि प्रदूषणाची स्थिती दर्शवली जाते. या फलकांवरील माहितीनुसार, पुणे शहराच्या हवेत ओझोन, कार्बनडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड यांचे प्रमाण नियंत्रणात असले तरी २.५ मायक्रॉन आणि १० मायक्रॉनच्या धूलिकणांचे प्रमाण लोहगाव, शिवाजीनगर, हडपसर, कोथरूड, पाषाण अशा सर्व मध्यवर्ती ठिकाणी धोक्याची घंटा वाजवत आहे.धूलिकणांच्या वाढत्या प्रमाणामुळे श्वसनाच्या विकारांचा धोका वाढला आहे. श्वसनाचे विकार असलेले रुग्ण, लहान मुले, वृद्ध यांनी कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा आरोग्यविषयक सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. प्रदूषणामुळे अस्वस्थता वाढल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे असल्याचेही आवाहनही केले जाते आहे.शहरामधील वाढती लोकसंख्या आणि पर्यायाने वाहनांचे वाढते प्रमाण हवामानाच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. १५ वर्षांहून जुनी वाहने स्क्रॅप करण्याची गरज असताना ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचेही ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे. १५ वर्षांपेक्षा जुनी सुमारे ९ लाखांहून अधिक वाहने पुण्याच्या रस्त्यांवरून धावत असल्याने हवामान ‘धोक्याची घंटा’ वाजवत आहे.स्कार्फ आणि सामान्य मास्कही उपयुक्त नाहीतप्रदूषण, हवेतील गारवा यांपासून संरक्षण व्हावे यासाठी पुण्यासारख्या शहरात मास्क किंवा मुलींमध्ये स्कार्फ वापरण्याची पद्धत आहे. मात्र, याचा प्रदूषणापासून संरक्षण होण्यासाठी उपयोग होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हवेतील धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याने साध्या कापडाने तितके संरक्षण होत नाही. मात्र अशा प्रकारच्या वातावरणात उपयुक्त असणारे ‘एन ९५ रेस्परेटरी मास्क’ सामान्यांना परवडणारे नाहीत. हे मास्क एकदा वापरून फेकून द्यावे लागते. तसेच या एका मास्कची किंमत ४० ते ४५ रुपये असल्याने सामान्य नागरिकांना ते अजिबातच परवडणारे नाही. श्वसनाचे आजार असणाऱ्यांनी हे टाळाफटाक्यांच्या धुरापासून दूर रहा सिगारेटचे व्यसन टाळा, सिगारेटचा धूर आजूबाजूला असेल तरीही त्यापासून दूर राहणे गरजेचे.घरातील अगरबत्ती, डासांसाठी वापरले जाणारे कॉईल वापरणे टाळा.चूल, शेकोटी यांच्या धुरापासून दूर राहावेकचरा जाळल्याच्या धुरापासूनही दूर रहाफटाके, प्रदूषण यांचा त्रास असणाऱ्यांनी घराबाहेर पडणे टाळावेआरोग्यासाठी धूलिकण धोकादायकचदिल्लीमध्ये वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील धूलिकणांचे प्रमाणही जास्त असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, श्वसनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. हवेतील वाढलेला गारवा, फटाक्यांमुळे होणारी दूषित हवा आणि इतर कारणांमुळे प्रदूषणाचा विळखा यांमुळे फुप्फुसांशी निगडित अस्थमा, ब्राँकायटिस यांसारखे आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढली आहे. या वातावरणाचा जास्त त्रास झाल्यास फुप्फुसाचा झटका येण्याचीही शक्यता असते. अशा वेळी रुग्णांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा; अन्यथा हा त्रास जिवावर बेतू शकतो. या काळात लहान मुलांना सर्दी, खोकला आणि कफ झाल्याने त्यांचीही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. - डॉ. नितीन अभ्यंकर, छातीचे विकारतज्ज्ञथंडीच्या दिवसांत हवा जड असते. त्यामुळे फटाके आणि प्रदूषणाचा धूर हवेत दीर्घकाळ टिकून राहतो. अशा वातावरणामुळे हवेमार्फत होणारे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतात. हवा प्रदूषित असल्यास फुप्फुसाबरोबरच हृदयरोग आणि रक्तदाब असणाऱ्यांनाही त्रास होतो. त्यामुळे जुने आजार असणारे रुग्ण, ज्येष्ठ व्यक्ती तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्ती कोणतेच काम योग्य पद्धतीने करू शकत नाहीत त्यामुळे त्यांची कार्यक्षमताही कमी होते. - डॉ. संदीप साळवी, संचालक, चेस्ट रिसर्च फाउंडेशन इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील प्रदूषणाची पातळी अद्याप नियंत्रणात आहे. मात्र, धोक्याची घंटा वाजण्यापूर्वी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एरव्हीच्या तुलनेत वाढत्या धूलिकणांमुळे आणि वाहनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे हवेची साधारण गुणवत्ता घसरली आहे. प्रदूषणाची पातळी ओलांडू नये, यासाठी पुण्यातील कंपन्या, नागरिक तसेच विविध माध्यमांतून पर्यावरणपूरकेवर भर दिला जात आहे.- प्रकाश मुंडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
पुण्याला प्रदूषणाचा विळखा
By admin | Published: November 08, 2016 1:44 AM