मोखाडा : शहरातील एकमेव तलावाच्या सुशोभीकरणाकडे पूर्वीच्या मोखाडा ग्रामपंचायत आणि आताच्या नगरपंचायतीचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष होते आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तसेच मोखाडा शहरात प्रवेश करतानाच प्रथम दृष्टिक्षेपात येणाऱ्या या तलावाभोवती आणि आतल्या बाजूने घाणीचे साम्राज्य तसेच तलावात प्रचंड गाळ निर्माण झाला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मोखाडा शहर हद्दीतील टाकपाडा, घोसाळी, मोखाडा, तेलीपाडा आदी गावपाड्यांतील श्री गणेशाचे तसेच दुर्गामातेचे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी भावपूर्ण विसर्जन केले जाते. यामुळे हा तलाव भाविकांच्या तसेच स्थानिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी येथे दररोज गर्दी होत असते. यामुळे हा तलाव विरंगुळ्याचे ठिकाणसुद्धा बनलेला आहे. मात्र, या तलावाच्या अवतीभोवती असलेल्या घाणीचा उग्र वास सहन होत नसल्याने येथे येणाऱ्या लोकांची संख्या कमी होते आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन तलावात साचलेला गाळ काढून साफसफाई ठेवली असती व सांडपाणी निचरा होण्यासाठी योग्य नियोजन केले असते तर मोखाडावासीयांसाठी हे एक उत्तम विरंगुळा केंद्र ठरले असते. (वार्ताहर) >मत्स्य व्यवसायाची संधीतलावातील गाळ काढून त्याचे सुशोभीकरण करणे व स्वच्छ पाण्यात मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून नगरपंचायतीला हजारोंचे उत्पन्न मिळू शकते. -हिरालाल अहिरे मोखाडा तालुका, आरपीआय अध्यक्ष
तलाव सुशोभीकरण अत्यंत गरजेचे
By admin | Published: June 11, 2016 3:40 AM