कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (मंगळवारी) करवीरनिवासिनी श्रीअंबाबाईची सिंहवाहिनी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.सकाळी आमदार सतेज पाटील, आमदार शंभूराजे देसाई, माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या हस्ते अंबाबाईचा अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर देवीची सिंहवाहिनी रूपात पूजा बांधण्यात आली. श्रीअंबाबाईचे वाहन सिंह असून, देवीच्या दिव्य स्पर्शाने व नित्य सान्निध्य सेवेने त्यालाही धर्ममयता व ईश्वरत्व प्राप्त झाले आहे. महिषासूर मर्दिनीही सिंहारूढच आहे. सिंह हा वनराज आहे आणि परम निर्भयतेचे प्रतीक आहे. त्याच्या उपासनेने महाभयांचा नाश होतो. नरसिंह हा सिंहाचा अंतर्भाव असलेला विष्णूचा अवतार प्रसिद्ध आहे. अनेक असुरांच्या वधावेळी देवीबरोबर युद्धभूमीवर दैत्य सैन्यांचा व वाहनांचा नाश केल्याचे व सिंहाच्या पराक्रमाचे वर्णन पुराण ग्रंथात आढळते. ही पूजा आशुतोष ठाणेकर, हृषीकेश ठाणेकर, प्रसाद लाटकर यांनी बांधली. दिवसभरात मनुग्राफ भजन संध्या, श्री विघ्नहर्ता महिला सोंगी भजनी मंडळ, वीरशैव महिला भजनी व रुद्र मंडळ, भक्तिसेवा महिला भजनी मंडळ, मुंबईतील स्वप्ना कुंभार यांचे नृत्यम हे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. (प्रतिनिधी)
अंबाबाईची सिंहवाहिनी देवीच्या रूपात पूजा
By admin | Published: October 05, 2016 5:37 AM