मुळची परळी येथील असलेली पूजा चव्हाण, इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात गेली आणि तिने आत्महत्या केल्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे. आज पूजाच्या कुटुंबीयांची सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तर दुसरीकडे जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजाबरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा, आम्ही न्याय मागतो भीक नाही पूजा चव्हाण यांची आत्महत्येची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी केली आहे.
#Karunadhananjaymundeजे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही आम्ही न्याय...
Posted by Karuna Dhananjay Munde on Saturday, February 20, 2021
जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा करुणा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच पूजाला भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट त्यांनी टाकत पूजासाठी न्याय मागत आहे. त्यातच सत्ताधारी पक्ष आपल्या मंत्र्यांना आणि सत्ता वाचविण्यासाठी हे प्रकरण दाबत आहे. या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आम्ही लढणार आहोत. यात ज्यांची नावे आली आहेत त्यांची नार्को टेस्ट करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भू माता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी परळी येथे आज केली.
Pooja Chavan: बेपत्ता मंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवीला येणार; महंतांच्या बैठकीत घोषणा
दुसरीकडेपूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्याच आहे. तसेच या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहे. पण या आत्महत्येप्रकरणी चौकशी देखील सुरु आहे. त्यामुळे चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र उलटपक्षी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे या पूजा चव्हाण आत्महत्येचा सीबीआय तपास व्हावा म्हणून मागणी करत आहे.