मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने केलेली आत्महत्या व संजय राठोड यांच्यावर या संदर्भात होत असलेल्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही योग्य नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचे मानले जाते.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘या प्रकरणात एक मंत्री असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता पोलीस काय करणार?’ असा सवाल केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी राठोड यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ, असे आदित्य म्हणाले. पूजा गरोदर होती का, तिचा गर्भपात करण्यात आला, हे प्रश्न आता उपस्थित झाले असून, पूजाच्या शवविच्छेदन अहवालाबाबत सुस्पष्ट माहिती पोलिसांकडून दिली जात नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
महिला आयोगाकडून दखलराष्ट्रीय महिला आयोगाने पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राज्य शासनाकडून विस्तृत अहवाल मागितला आहे. या प्रकरणी होत असलेल्या विविध आरोपांबाबतची वस्तुस्थिती काय, अशी विचारणादेखील आयोगाने केली आहे.
हकालपट्टी करा; भाजपची मागणीराठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली. राठोड यांना मंत्रिमंडळातून हटविले जात नसेल तर त्याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्री संरक्षण देत आहेत असा होईल. पुरावे लक्षात घेता राठोड यांचा पूजा चव्हाण आत्महत्येची संबंध असल्याचे दिसते असे ते म्हणाले.