पुणे : विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचा संबंध जोडल्या गेलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने पत्र पाठवले आहे. या प्रकरणी तपासानंतर अहवाल पाठविणार असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७) इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या यावरुन समाज माध्यमांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे. या तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपाने व्यक्त केला आहे.पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले, राष्ट्रीय महिला आयोगाचे पत्र मिळाले असून सर्व अंगाने तपास सुरु आहे. तिचे कुटुंबीय गावी असून आमच्याकडे त्यांच्यापैकी कोणाचीही तक्रार आलेली नाही. घटनेवेळी उपस्थित असणारा तिचा चुलतभाऊ, मित्र व संबधितांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
भाड्याने घेतले होते घरपूजा चव्हाण राहात होती, ते घर तिने भाड्याने घेतले होते. गेल्या ८ दिवसांपूर्वीच पूजा तेथे राहण्यासाठी आले होते. या घराची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा घरात मद्याच्या ४ बाटल्या सापडल्याचा दावा केला जात आहे. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरुन घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तांत्रिक अडचण वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड म्हणाले, पूजाचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. तिच्या सोबत असलेल्या तिच्या चुलत भावाचे आणि मित्राचे जबाबही घेतले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यात गुन्हा नोंद करता येत नाही. मात्र या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत आम्ही तपास करणार आहोत.
आयुक्तांना बोलावले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना शुक्रवारी रात्री मुंबईला तातडीने बोलावून घेत संपूर्ण माहिती घेतली आहे. पूजाने मद्य प्राशन केले होते. ती गॅलरीच्या कठड्यावर बसलेली होती, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.