नियुक्तीच्या ठिकाणी केलेल्या अवाजवी मागण्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांची पुण्याहून वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचेही आदेश दिले गेले आहेत. तसेच पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनाही विविध चौकशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पूजा खेडकर यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी आपल्या मुलीचा बचाव केला आहे. एका महिलेने बसण्यासाठी जागेची मागणी करून कुठलीही चूक केलेली नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल. यामागे कुणीतरही आहे जो हे सारं जाणीवपूर्वक करत आहे, असं विधान त्यांनी केलं आहे.
पूजा खेडकर यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाबाबत प्रतिक्रिया देताना पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर म्हणाले की, पूजा हिने नॉन क्रिमिलेअरमधून अर्ज केला होता की क्रिमीलेअरमधून या प्रश्नाचं उत्तर आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीसमोर देऊ. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही बोलणं योग्य ठरणार नाही. आम्ही सारं काही नियमानुसार केलं आहे. तसेच त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे, असं ते म्हणाले.
दिलीप खेडकर पुढे म्हणाले की, याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडावी का, याबाबत आम्ही वकिलांशी सल्लामसलत करत आहोत. आमच्या मुलीला त्रास दिला जात आहे. तिच्याकडून कुठलीही चूक झालेली नाही. एका महिलेने बसण्यासाठी जागेची मागणी करून कुठलीही चूक केलेली नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल. यामागे कुणीतरही आहे जो हे सारं जाणीवपूर्वक करत आहे.