मुंबई : दोन्ही पिकं गेली आहेत. पुढच्या दोन ते तीन महिन्यांचा काळ संवेदनशील आहे. पीक गेलेच आहे, आता पाणीही नाही. त्यामुळे दु:खात असताना आम्हाला (शेतकऱ्यांना) दारू जवळ करावीशी वाटते. त्या नशेत बैलाच्या गळ्यातला कासरा शेतकरी गळ्याला लावतो, हे होऊ द्यायचे नसेल तर मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तीन महिन्यांसाठी दारूबंदी जाहीर करा. थोडा महसूल बुडेल. पण अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचतील, असे भावनिक आवाहन नानांनी केले तेव्हा अवघे सभागृह गदगदून गेले. अणेंना नानांचा टोला विदर्भ आणि मराठवाड्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांना नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणातून कोपरखळी मारली. ‘अणे, विदर्भ माझा, खान्देश माझा आणि बिहारसुद्धा माझाच आहे. तुमचे वक्तव्य चूक की बरोबर, गैर आहे की नाही याची मीमांसा मला करायची नाही. माझा एक हात-पाय तोडला तर मी जिवंत कसा राहू शकतो? आपण सगळ्यांनी एकत्र राहू या.’ नानांच्या या वाक्यावर सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ‘नानां’साठी सर्वाधिक मते : ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अॅवॉर्ड’ पुरस्कारासाठी ‘नटसम्राट’ चित्रपटासाठी नाना पाटेकर यांचे नामांकन होते. पुरस्कारासाठी आॅनलाइन मतदान होते. ८० नामांकनांमध्ये सर्वाधिक मते नानांना मिळाली.आमच्या पोलिसांना घरे कधी मिळतील, असा सवाल नानांनी मुख्यमंत्र्यांना केला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ‘नाना, तुम्ही माझ्या मनातील प्रश्न विचारलात, या वर्षी पोलिसांच्या २९ हजार घरांचे नियोजन केले आहे. पोलिसांना हक्काचे, कायमस्वरूपी घर मिळण्याकरिता जे विकासक पोलिसांना घरे देतील, त्यांना अधिक चटईक्षेत्र निर्देशांक देत असल्याचे स्पष्ट केले.’ यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.