महायुतीमध्ये अजित पवारांची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झालेली आहे. शिवसेना नेते अजित पवारांसोबत बसून बाहेर आल्यावर उलट्या होतात असे सांगत फिरत आहेत. भाजपवाले अजित पवारांना सोबत घेऊन पक्ष रसातळाला नेला असे आरोप करत आहेत. तरीही अजित पवारांना महायुती सोडवत नाहीय. असे असताना नुकतेच अजित पवारांनी आपण विधानसभेच्या ६० जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आणि आता पुन्हा एकदा यावर अधोरेखित झाले आहे.
अजित पवार गट काही दिवसांपूर्वी ८० जागा लढविणार असल्याचे सांगत होता. तेच आता ६० वर आले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून अजित पवारांना टोले हाणले आहेत. बिच्चारे अजित दादा आमच्यासोबत असते तर किमान सव्वाशे जागा लढले असते. हा चुकलेल्या निर्णयाचा भोग असल्याचा टोला वडेट्टीवारांनी हाणला.
निवडणूक लागण्यापूर्वी अजित पवार ६० वर आले आहेत. पुन्हा चर्चेतून ते ४० वर येण्याची शक्यता आहे. आता ६० मागाव्यात आणि जे पदरात पडतेय ते पाडून घ्यावे. अजित पवारांची अवस्था या दोघांनी वाईट करून ठेवलीय याची आम्हालाच आता कीव येतेय, असे वडेट्टीवार म्हणाले.
महायुतीत भागीदार जेवढे वाढतील तेवढ्या काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत. भाजप जेवढ्या जास्त जागा लढेल त्याचा काँग्रेसला फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी एक जागा जिंकली आणि भाजपा, शिंदे गटात पोटशूळ उठला. त्यांना हिस्सेदार वाढवायचा नाहीय. पुन्हा सत्ता आली तर वाटेकरी वाढतील म्हणूनच अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.