सचिन राऊत,
अकोला-मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर असताना, आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या तिच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि कुटुंबावर दुखाचा डोंगरच कोसळला. या कुटुंबाची व्यथा ‘लोकमत’ने समाजासमोर मांडली आणि एका माजी राज्यमंत्र्याने या मुलीचे पितृत्व स्वीकारून, तिच्या लग्नाचा पूर्ण खर्च उचलला. मंगळवारी धारेल येथे थाटा-माटात या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. एकीकडे पिता गेल्याचे दु:ख, तर दुसरीकडे विवाहाचा आनंद, अशा सुख-दु:खाच्या भावनांचा योग या सोहळ्यामध्ये होता.धारेल येथील शेषराव शहादेव ठोसरे यांची मोठी मुलगी लक्ष्मी हिचा विवाह १६ एप्रिल रोजी ठरला होता. लग्नाचा खर्च डोळ्यासमोर येऊन ठोसरे यांची मन:स्थिती खचल्याने त्यांनी आत्महत्या केली. ‘लोकमत’ने या कुटुंबाची व्यथा समाजासमोर मांडल्यानंतर माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी लक्ष्मीला दत्तक घेत, तिच्या लग्नाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारीही स्वीकारली. २६ एप्रिल रोजी हा विवाह धारेल येथे थाटातपार पडला.गावंडे यांनी तिला मोठ्या प्रमाणात आंदणही दिले. कन्यादान गावंडे यांनी केले, तर पाणेरीसाठी भावाच्या जागेवर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संग्राम गावंडे यांनी पुढाकार घेतला. गावंडे यांनी या विवाहासाठी मंडप उभारला होता. पाहुण्यांसाठी कुलरची व्यवस्था होती. मुलीला टीव्ही, कूलर, ड्रेसिंग टेबल, दिवाण, सोफा, मिक्सर, गोदरेज कपाट, आवश्यक भांडी सेट आंदण म्हणून देण्यात आले. पाहुण्यांना पंचपक्वान्न देण्यात आले होते. या विवाहासाठी आकोट, तेल्हारा, चोहोट्टा बाजार, करोडी, रेल, धारेलसह परिसरातील मंडळी उपस्थित होती.>‘लोकमत’मुळे जुळल्या रेशीमगाठीशेषराव ठोसरे यांच्या आत्महत्येनंतर त्यांची मुलगी लक्ष्मीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला असताना, ‘लोकमत’ने हा प्रश्न समाजासमोर आणला. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, संग्राम गावंडे यांनी पुढाकार घेऊन लक्ष्मीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली. विवाह सोहळ्यादरम्यान गावंडे, वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन अमदाबादकर, धारेल येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले.