संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमी दराने गत मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेली ज्वारी शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचे निर्देश शासनाच्या पुरवठा विभागामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गरीब शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात एक रुपया किलो दराने नवीन ज्वारी वाटप करण्यात येणार आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात हमी दराने ज्वारी खरेदी करण्यात आली. १ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल दराने गत मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेली ज्वारी पुरवठा विभागांतर्गत शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. हमी दराने खरेदी करण्यात आलेली ज्वारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो एक रुपया दराने वाटप करण्याचे निर्देश शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत गत २२ मे रोजी पत्राद्वारे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांना देण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत हमी दराने खरेदी करण्यात आलेली नवी ज्वारी गरीब शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो एक रुपया दराने ज्वारीचे वितरण रास्त भाव दुकानांमधून करण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकांना ज्वारीचे वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांमार्फत जून महिन्यात ज्वारी वितरणाचे नियतनही मंजूर करण्यात आले आहे.अकोला जिल्ह्यात १५ हजार क्विंटल ज्वारी वितरणाचे नियोजन!च्हमी दराने ज्वारी खरेदीत गत मार्च महिन्यापर्यंत अकोला जिल्ह्यात २३ हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली. त्यापैकी १५ हजार क्विंटल ज्वारी जून महिन्यात जिल्ह्यात शिधापित्रकाधारकांना वितरित करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. उर्वरित आठ हजार क्विंटल ज्वारी यवतमाळ जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहे.शासनाच्या निर्देशाप्रमाणे गत मार्चपर्यंत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेली ज्वारी जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येणार आहे. जून महिन्यात जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना १५ हजार क्विंटल ज्वारी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.-अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.
गरिबांना मिळणार एक रुपया किलो ज्वारी!
By admin | Published: June 13, 2017 1:44 AM