ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 25 - संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूक अभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली. उमेश कुलकर्णी यांच्या वळू चित्रपटातून या मूक अभिनेत्याने संपूर्ण महाराष्ट्रात धमाल केली होती. सांगलीतील पांजरपोळमध्ये वास्तव्यास असलेल्या या तीनशे किलो वजनाच्या वळूचे निधन झाल्यानंतर अनेकजण हळहळले. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या २००८ मधील वळू चित्रपटाचा हा खराखुरा नायक प्रत्यक्षात खलनायकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रात लोकप्रिय झाला होता. राज्य व राष्ट्रीय विविध संस्थांचे पुरस्कारही त्याने पदरात टाकले. तब्बल तीनशे किलो वजन, लालसर डोळे, दहशत बसावी अशी जाडजूड शिंगे अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतील पांजरपोळातील. चित्रपटासाठी पाहिलेल्या तब्बल तीनशे वळूंमधून सांगलीच्या या वळूची निवड दिग्दर्शकाने केली होती. सांगलीचा हा गुणी मूक कलाकार गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने खाणे-पिणे सोडले होते. त्यामुळे तीनशे किलोवरून त्याचे वजन दोनशे किलोपर्यंत घटले होते. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. वजन जास्त असल्याने तसेच तो वृद्ध झाल्याने उपचारास साथ मिळत नव्हती. अखेर रविवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती येथील डॉ. उद्धव धायगुडे यांनी दिली. पांजरपोळ संस्थेचे अक्षय भोसले यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा वळू आमच्याकडे होता. स्वभावाने शांत व खाण्यात अव्वल होता. दिसायला तो अत्यंत देखणा होता. रविवारी सकाळी त्याचे निधन झाल्यानंतर संस्थेचे सर्व संचालक त्याला पाहण्यासाठी आले होते. संस्थेच्याच जुना बुधगाव रस्त्यावरील मळ्यामध्ये त्याचे दफन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेच्यावतीने वळूला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रमोद पाटील, रामचंद्र मोहिते, रमेश राजमाने, माधवदास शेठजी, राधेश्याम बजाज, शशिकांत आवटी, तात्यासाहेब तामगावे आदी उपस्थित होते. वळू चित्रपटाबद्दल दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, चित्रपटासाठी तब्बल तीनशेंवर वळू फिरून पाहिले. हा वळू मात्र शांत-सुस्वभावी निघाला. त्याने आम्हाला खूप चांगले सहकार्य दिले. त्याची एकच सवय होती. गाय दिसली की तो उधळायचा. चित्रीकरणादरम्यानही अशा घटना त्याच्याबाबतीत घडल्या होत्या.