गोपालकृष्ण मांडवकर, चंद्रपूरपर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार एकीकडे वेगवेगळ्या उपाययोजना आखत असले, तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येऊ पाहणा-या देशी-विदेशी पर्यटकांना यंत्रणेच्या गाफीलपणाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. ५ आणि ६ मार्चला येथील पर्यटनासाठी देशी-विदेशी पर्यटकांनी आॅनलाईन आरक्षण केले आहे. मात्र, होळीनिमित्त ताडोबा बंद ठेवण्याचे कारण पुढे करून ऐनवेळी हे सर्व आरक्षण रद्द करण्याचे आदेश निघाले आहेत. दरवर्षी होळीनिमित्त ताडोबा अभयारण्यातील पर्यटन बंद असते. मात्र, यंदा तशी कुठलीही आगाऊ सूचना देण्यात न आल्याने पर्यटकांनी आॅनलाईन आरक्षण केले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्चला ९३, तर ६ मार्चला ६३ अशा एकूण १५६ वाहनांचे आरक्षण झाले आहे. ताडोबा व्याघ्र उद्यानातील भ्रमंतीच्या या आरक्षणासोबतच या परिसरातील रिसॉर्टस् आणि जिप्सी वाहनेही पर्यटकांकडून आरक्षित करण्यात आली आहेत. अगदी कालपरवापर्यंत हे आॅनलाईन आरक्षण सुरू होते. परंतु ही चूक लक्षात येताच नागपुरातील प्रधान मुख्य वन संरक्षण कार्यालयाने ५ आणि ६ मार्चला होळी आणि धुलीवंदन असल्याचे कारण पुढे करून हे दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश काढले. मात्र,तोपर्यंत १५६ वाहनांचे आरक्षण होऊन गेले होते. ही बाब लक्षात आल्यावर वेबसाईटवरील या दोन दिवसांचे आरक्षण ब्लॉक करण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाईट चालविणाऱ्या यंत्रणेकडून हा घोळ झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पाच्या डाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची जबाबदारी महाराष्ट्र आॅनलाईनकडे आहे. दरवर्षी होळीच्या तारखा बदलत असतात. मात्र, या वर्षी तारखांमध्ये दुरूस्ती न झाल्याने हा घोळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसांपूर्वी ही बाब लक्षात येताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव महाराष्ट्र) यांच्या नागपुरातील कार्यालयाकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपुरातील क्षेत्रीय संचालकांच्या कार्यालयाला सूचना देण्यात आली. त्यानंतर आॅनलाईन बुकिंग थांबविण्यात आले.आरक्षण करणाऱ्या पर्यटकांमध्ये बहुतांश परदेशी नागरिक असल्याने पेच निर्माण झाला आहे. वनविभाग आणि महाआॅनलाईन यांच्यामध्ये समन्वय नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले़
होळीमुळे पर्यटकांचा बेरंग
By admin | Published: February 25, 2015 2:07 AM