- रवींद्र आंबेकर
गणपती किंवा इतर सणाच्या काळात कर्णकर्कश्श आवाजात डीजेवर, तथाकथित अश्लील गाण्यांवर बीभत्स नाच केला जातो. त्याचा अनेकांना त्रास होतो. खरं तर ही गाणी लिहिणाऱ्यांना अभिप्रेत असलेला भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो. ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न... हा विद्यादानाचा गीतरूपी ठेवा गणेशउत्सवाच्या माध्यमातून लोकांच्या कानी जबरदस्ती उतरवणाऱ्या मंडळांनाही सलाम...
आता वाट बघतोय रिक्षावाला हेच गाणं बघा ना...
कामावर जायला उशीर झायला
बघतोय रिक्षावाला
वाट माझी बघतोय रिक्षावाला...
अतिशय भाव पूर्ण गाणं आहे.
अर्थात या धकाधकीच्या जीवनात माझ्या हातून सरळ काहीच होत नाहीय. माझी सगळी गणितं चुकतायत. मला काहीच सुचत नाहीय. कोणीच सोबती नाही, सहकारी नाही, मदत करायला नाही. आपल्याला उशीर झाल्यावर, लगबग असताना जसं आपण रिक्षावाल्याला शोधत असतो, बघत असतो. आपल्याला बघून रिक्षावाला जोरात पुढे जातो असं वाटत असतो. तोही आपल्याला नाकारतो असं आपल्याला वाटतं. अर्थात अडचणीत सापडल्यावर भगवंत शोधत असतो. भगवंत आपल्याला सोडून पुढे चाललाय अशी आपली भावना होते, नैराश्य येते. पण प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत आपल्याला बघत असतो. त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही. आणि समस्यांना तोंड द्यायला तो आपल्याला समर्थ करतो... तो म्हणतो तु हो पुढे मी तुझ्या पाठिशी आहेच...
बिडी जलैले जिगर से पिया ...
जिगर मा बडी आग है....
अर्थात या ह्रदयात भगवंताच्या भक्तीची आग पेटली आहे. या आगीच्या धगीचा- अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे. कुणाला थोडी आग दिल्याने ती कमी होणार नाही. भगवंताच्या भक्तीने माझ्या ह्रदयात लागलेली ही आग इतरांच्या बॉडीत, बीडी अर्थात श्वास फुंकण्याचं काम करत आहे.
आवाज वाढव DJ तुला आईची शप्पथ आहे...
अर्थात या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज क्षीण झालाय. हे DJ म्हणजे भगवंता हा आवाज वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्याशी तादात्म पावण्यासाठी, माझा आवाज तुझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर... हे भगवंता तू हे करणार नसशील तर जगन्नियंता असलेल्या तुझ्या आईची तुला शपथ आहे. माझा जीव तळमळतोय.
पप्पी दे पप्पी दे पारूला
अर्थात हे भगवंता मी किती ही मोठा झालो तरी तुझ्या समोर लहानच आहे. श्लील- अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर. जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे. मला तो निरागस भाव दे.
पोरी जरा जपून दांडा धर...
शिटी वाजली, गाडी सुटली, पोरी जरा जपून दांडा धर या गाण्याच्या माध्यमातून मुलींच्या करीअरच्या संदर्भात जे काही मार्गदर्शन गीतकारानं केलं आहे, त्याला तोड नाही. नीट आली गेली, सीईटी आली गेली... उच्च शिक्षण घ्यायचं असेल, सावित्रीच्या लेकींना मुलांच्या खांद्याला खांदा लावून करीअर घडवायचं असेल तर मुलींनी शिक्षणरूपी दांडा घट्ट पकडायला हवा असा मुलभूत संदेश या गाण्यात आहे...
तर, शांतताप्रेमी गणेशभक्तांनो... उगाच त्रास करून घेऊ नका... या गोंगाटामागची समाजसेवी तळमळ समजून घ्या, उगीच टिळक तुम्ही आज असतात तर वगैरे आउटडेटेड मेसेज फॉरवर्ड करू नका आणि मुन्नी बदनाम हुई, डर्लिंग तेरे लियेचा गर्भित अर्थ शोधायला लागा...
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)