पुणे : छोटे-मोठे रस्ते, गल्लीबोळ, छोटे चौक अशा ठिकाणी अचानक उद्भवणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाय शोधला असून, आता चक्क ‘पोर्टेबल सिग्नल’ सिस्टीमद्वारे आपत्कालीन वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना मिरवणुका, आंदोलने, मोर्चे आणि खोदकामामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या वेळी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. आषाढी वारी, गणेशोत्सवामध्ये या सिग्नल्सचा वापर प्रभावी ठरेल, अशी माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. शहरातील मुख्य रस्ते आणि त्यावरील चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था आहे; मात्र छोट्या अरुंद रस्त्यांवर, चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था नसते. गर्दीच्या वेळी वेड्यावाकड्या पद्धतीने; तसेच पुढे जाण्याच्या घाईत वाहनचालक वाहने कशीही दामटवतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. त्याचा परिणाम अन्य रस्त्यांवर होतो.यासोबतच शहरामध्ये सध्या विद्युतवाहिन्या, सीएनजी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदाईची कामे सुरू आहेत. पीएमपी बस बंद पडल्यामुळे, तर कधी मिरवणुका, मोर्चा आणि आंदोलनांमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होते.अशा वेळी वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशी स्थिती हाताळणे एकट्या पोलिसाच्या आवाक्याबाहेरचे असते. अशा वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगे ‘पोर्टेबल सिग्नल्स’ वापरण्यात येणार आहेत.
वाहतूककोंडीवर पोर्टेबल सिग्नल
By admin | Published: March 04, 2016 12:46 AM