मुंबई - बरीच वर्षे लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज सकाळी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यपाल विद्यासागर राव यांनी एकूण 13 नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचाही समावेश आहे. दरम्यान, नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमधून ही माहिती दिली.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नव्याने मंत्रिमंडळात सामील झालेल्या मंत्र्यांचे खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधानसभेच्या पावसाळी एकूण 28 विधेयकांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच आतापर्यंत 4 हजार 700 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला गती आली होती. या विस्तारामध्ये माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना स्थान मिळणार का याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, अॅड आशिष शेलार, डॉ. अशोक उईके, प्रा.डॉ. तानाजी सावंत, सुरेश खाडे, डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर संजय भेगडे, अतुल सावे, अविनाश महातेकर, योगेश सागर, डॉ. परिणय फुके यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे- या अधिवेशनात एकूण 13 विधेयक मांडण्यात येतील.- दुष्काळ आणि त्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना यावर सर्वंकष चर्चा केली जाईल.- 4700 कोटी रूपये दुष्काळग्रस्तांना देण्यात आले. 3300 कोटी रूपये पीकविम्यासाठी - प्रधानमंत्री किसान निधीचा लाभ सुमारे 1.20 कोटी शेतकर्यांना मिळणार आहे. यासाठी शेतकर्यांचे खाते अपलोड करण्याचे काम अतिशय गतीने करण्यात येत आहे.- या अधिवेशनात अर्थसंकल्प सुद्धा मांडला जाईल- विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे.