मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आधी करून नंतरच राष्ट्रवादीसह सर्वांचे खातेवाटप जाहीर केले जाईल असा दावा होत असतानाच आता येत्या दोन दिवसांत आधी खातेवाटप केले जाईल व नंतरच विस्तार केला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी २ जुलै रोजी झाला. मात्र, अद्याप राष्ट्रवादीचे सर्व मंत्री बिनखात्याचे आहेत. विस्ताराची वाट न पाहता खातेवाटप करावे असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मान्य केल्याने खातेवाटपासाठी विस्ताराची वाट बघितली जाणार नाही असे म्हटले जात होते. 'खातेवाटप हे येत्या काही तासांत जाहीर केले जाईल; पण मी विस्ताराबाबत सांगू शकत नाही' असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विस्तार अधिवेशनापूर्वी की नंतर?
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु होईल. यापूर्वी विस्तार करावा असा शिवसेनेच्या आमदारांचा (अपक्षासह) मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव आहे. भाजपमधील इच्छुकही याकडे डोळे लावून बसले आहेत. खातेवाटप लवकर करा, असा राष्ट्रवादीचा दबाव आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार केल्यास नाराजीनाट्य होईल व अधिवेशनात विरोधक त्यावरून टीका करतील. त्यामुळे आता अधिवेशनानंतरच विस्तार करावा असाही सूर आहे. त्यामुळे विस्तार अधिवेशनापूर्वी होण्याबाबत अनिश्चितता आहे.
पालकमंत्रिपदावरून धुसफूस
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप गुरुवारपर्यंत केले जाईल, सोबतच पालकमंत्रीही जाहीर केले जातील असे सूत्रांनी सांगितले. पालकमंत्री पदावरून काही जिल्ह्यांत धुसफूस सुरु आहे. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे मंत्री झाल्याने रायगडचे पालकमंत्रिपद त्यांना मिळणार अशी चर्चा आहे. मात्र, या जिल्ह्यातीलच शिंदे गटाचे आ.भरत गोगावले म्हणाले की, तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे; पालकमंत्री पदाची नाही. रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेकडेच असेल अन् भरत गोगावलेकडेच असेल.
अद्याप तिघांची एकत्र चर्चा नाही?
विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अद्याप एकत्रित चर्चा झालेली नाही. भाजप श्रेष्ठींनीही याला हिरवा झेंडा दिलेला नाही. १४ मंत्रिपदे रिक्त आहेत. विस्तार होईल तेव्हा त्यात ६ ते ८ राज्यमंत्री असतील असेही म्हटले जाते.