मुंबई : स्टील उद्योगातील आघाडीची दक्षिण कोरियन कंपनी पॉस्को ही राज्यात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातरडा येथे स्टील प्रकल्प उभारण्यासाठी पॉस्कोने उत्तम ग्वाला समूहाशी परस्पर सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पात आॅटोमोबाइल उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या स्टील कॉईल्सचे उत्पादन केले जाईल. निम्न दर्जाचे लोखंड हे स्टीलमध्ये परावर्तित करण्याचे कामही या ठिकाणी होणार आहे. जनरल मोटर्स आणि फॉक्सकॉन या नामवंत कंपन्यांनंतर पॉस्कोच्या माध्यमातून तिसरी मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे. पॉस्को कंपनीने या आधी कर्नाटक आणि ओडिशामध्ये गुंतवणुकीचा केलेला प्रयत्न फलद्रूप झालेला नव्हता. ओडिशामध्ये १९९०च्या सुमारास झालेला प्रयत्न, भूसंपादनाला झालेला विरोध आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे फसला होता. आठ महिन्यांच्या काळात राज्यात ६६ हजार कोटी गुंतवणूक खेचून आणण्यात आम्हाला यश आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पॉस्को कंपनी करणार १० हजार कोटींची गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2015 2:48 AM