मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या विधानसभेच्या १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात शनिवारी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विरोधकांना दिले. तसेच, विधान परिषद सभागृहाचा कोणालाच अवमान करता येणार नसल्याचे सांगतानाच आमदार अनिल गोटे यांना कडक समज देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत बोलताना स्पष्ट केले. शेतकरी कर्जमाफी, आमदारांचे निलंबन आणि गोटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेवेळा दोनवेळा कामकाज स्थगितही करावे लागले. त्यानंत, स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. अर्थसंकल्पानंतर २२ तारखेपासून आम्ही नियमित कामकाज करण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र, त्याचदिवशी सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. आणि कामकाजात तिढा निर्माण झाला. मधल्याकाळात बैठका झाल्या. मात्र तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विरोधक सध्या संघर्षयात्रा करीत आहेत , असे सुनील तटकरे म्हणाले. तत्पूर्वी बोलताना काँगे्रस सदस्य नारायण राणे यांनीही आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा न करता निलंबन मागे घ्यावे. तसेच अनिल गोटे यांच्या वक्तव्यावर सरकारकडून अद्यापही हस्तक्षेप केला जात नसल्याचे ते म्हणाले. गोटे यांच्यामागे बोलविता धनी कोण आहे, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
निलंबित आमदारांबाबत आज सकारात्मक निर्णय - मुख्यमंत्री
By admin | Published: April 01, 2017 3:18 AM